अमरावती -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा पंढरपूरमधील आषाढी एकादशीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होत आहे. कोरोनामुळे पंढरपूरमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ मानाच्या दहा पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे केवळ दहा पालख्या पंढरपूरला जाणार आहे. यामध्ये विदर्भाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या माता रुक्मिणीचे माहेर घर असलेल्या कौंडण्यपूर माधीलही रुक्मिणी मातेची पालखी देखील आज दोन एसटी बसने केवळ चाळीस वारकऱ्यांसह पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
तत्पूर्वी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज बारा वाजेच्या सुमारास रुक्मिणीच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच पालखीला प्रदक्षणा देखील घालण्यात आली. पालखीचे यावर्षीचे 428 वे वर्ष आहे. पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातली सर्वात पहिली पालखी असल्याचे सांगण्यात येत आहे.