अमरावती -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे(Maharashtra State Transport Corporation) राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन (ST Strike ) सुरू आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, या खाजगी वाहन चालकांकडून (Amravati Private Travels) सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. या वाहन चालकांनी प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट तिकीट भाडे वसूल करत असल्याचा प्रकार ईटीव्हीच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ST Workers Strike : अमरावतीत खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट; ईटीव्ही भारतचे 'स्टिंग ऑपरेशन' - ST Strike
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. खाजगी वाहन चालक प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट तिकीट भाडे वसूल करत असल्याचा प्रकार ईटीव्हीच्या छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एसटी बंद असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे अतोनात हाल मागील 17 दिवसांपासून सुरू आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत. बाहेर गावचे विद्यार्थी, ग्रामीण भागातील विद्यार्थी एसटी बसचा पास काढून अमरावती शहर गाठत असतात. मात्र, एसटी बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान खासगी वाहनात दाटीवाटीने बसून जीव मुठीत घेऊन या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. तसेच खाजगी वाहनचालकांकडून जादा भाडे आकारण्यात येत असल्यामुळे बहुतांश गरीब विद्यार्थ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे त्यांनी घरी राहण्यास पसंती दिली आहे.