अमरावती -चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता मध्यरात्री बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज मध्यरात्री महानगर पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढला. त्यानंतर अमरावतीच्या दर्यापूरमध्येही विनापरवानगी शिवसेनेच्या वतीने मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा हटवण्याच्या हालचाली शासनाच्या वतीने सुरू आहे. हा पुतळा हटवू नये यासाठी दर्यापूर येथे प्रहारच्या वतीने आज संध्याकाळी पाण्याच्या टाकीवर चढून वीरूगिरी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा स्थापन होणारच, राणा दाम्पत्याचा निर्धार
दर्यापूर येथे विनापरवानगी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुतळ्याला हटवण्याच्या हालचाली होत असल्याने प्रहारकडून आंदोलन करण्यात आले. सध्या दर्यापूर शहरात देखील तनावाचे वातावरण निर्माण झाले असून, ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अमरावतीनंतर दर्यापूरमध्ये बसवण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे पुतळे बसवण्याची अमरावतीत स्पर्धा तर लागली नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.