अमरावती -देशातील संपूर्ण विज उद्योगाचे खासगीकरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या एकतर्फी निर्णयाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अमरावती शहरातील ऊर्जा भवन समोर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंते व कंत्राटी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडून दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
'या' विषयावर पुकारला संप :देशातील संपूर्ण वीज उद्योगांचे खासगीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने एकतर्फी निर्णयानुसार आणलेले विद्युत संशोधन बिल 2021, महाराष्ट्राच्या सहा जलविद्युत केंद्राचे खासगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय, वीज वितरणच्या तिन्ही कंपन्यांमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण, तीस हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीचे आरक्षण, रिक्त जागांवर भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप इत्यादी धोरणात्मक प्रश्नावर वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता व कंत्राटी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय गावकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.