अमरावती -अमरावती शहरात घडलेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल तसेच नागपूर, अकोला, बुलढाणा, उस्मानाबाद अशा विविध जिल्ह्यातूनही पोलिसांची कुमक अमरावती शहरात तैनात आहे. चार दिवसांपासून बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना चहापाणी जेवण देण्याची व्यवस्था काही सामाजिक संघटनेच्यावतीने केली जात असतानाच बुलढाणा येथून आलेल्या 52 पैकी 35 पोलिसांना अमरावती परतवाडा मार्गावरील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात आश्रय मिळाला आहे. पोलिसांसाठी चार-पाच तासांच्या आरामाची व्यवस्था या वृद्धाश्रमात झाली असून या पोलिसांच्या जेवणाची सोयही वृद्धाश्रमाच्या वतीने केली जात आहे.
35 पोलिसांना मिळाला वृद्धाश्रमात आधार -
बुलढाणा येथून आलेल्या 52 पोलिसांपैकी एकूण 35 पोलीस हे वलगाव ते गाडगे नगर परिसरात तैनात आहेत. संचारबंदी आणि तणावाच्या वातावरणामुळे पोलिसांसमोर अनेक अडचणी येत असताना या 35 पोलिसांच्या जेवणाची आणि त्यांना जी काही 347 तासांची सुट्टी मिळते त्यादरम्यान आरामाची व्यवस्था संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक कैलास बोरसे यांच्यावतीने या सर्व पोलिसांची योग्य अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
30 वृद्धांना सोबत पोलिसांचीही पंगत -
संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात एकूण 30 वृद्ध व्यक्ती आहेत. यातील वृद्ध व्यक्तीं सोबतच पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून प्रधान सोबत पोलिसांचीही पंगत संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात सकाळी 11 वाजता बसते आहे. सायंकाळी कर्तव्या वरून काही पोलीस आठ वाजता तर काही रात्री अकरा वाजता वृद्धाश्रमात येतात त्यावेळी त्यांना गरम जेवण मिळावे, याची काळजी वृद्धाश्रमाच्यावतीने घेतली जात आहे.
कैलास बोरसे म्हणतात ही गाडगेबाबांची शिकवण -
अडचणीत असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणे हाच संदेश आणि शिकवण कर्मयोगी संत गाडगे महाराजांनी दिला आहे. गाडगे महाराजांच्या शिकवणीचा आदर्श समोर ठेवूनच आम्ही या वृद्धाश्रमात निराधार बुद्धांची सेवा करतो. आज अमरावती शहरातील परिस्थिती तणावाची आहे. शहर पुन्हा पूर्वपदावर यावे, यासाठी पोलीस बांधव प्रयत्न करीत असताना आम्हाला बुलढाणा येथून आलेला या पोलीस बांधवांनी सेवा करायला मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे. शहरातील तलाव लवकरच संपावा आणि शहर पूर्वपदावर यावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत कैलास बोरसे यांनी 40 ते 45 तासांपर्यंत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचा ताण कमी व्हावा, अशी अपेक्षा 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली. अमरावती शहरात तणावाचे वातावरण असताना गाडगेबाबा वृद्धाश्रमात मिळालेला आश्रय हा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा असल्याचे वृद्धाश्रमात थांबलेल्या पोलिसांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - Shashi Tharoor Interview : 'हिंदुत्व ही अत्यंत भ्रामक संज्ञा, धर्माचा राजकारणाशी काहीही संबंध नाही'