अमरावती -कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत असून, लहान मुलांची मानसिकता सुद्धा बरीचशी बदलली आहे. असे असताना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गंभीर असा कुठलाही परिणाम बालकांमध्ये आढळून आला नसून, आता अमरावती शहरातील शाळा सुरू करण्यास कुठलीही हरकत नाही, अशा सूचना बाल रोग तज्ञाकडून येत असताना जिल्हाधिकार्यांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पालकांनीसुद्धा आता शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
माहिती देताना पालक आणि बाल रोग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Statue : राजापेठ उड्डाणपूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणारच, आमदार रवी राणा यांनी राज्यपालांनाही दिली माहिती
सगळे सुरू मग शाळा का बंद?
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे संकट निर्माण झालेले आम्ही पाहिले. हे संकट रोखण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट आल्यावर बाजारपेठ, शासकीय कार्यालये सर्व काही सुरळीत सुरू आहे, मात्र केवळ शाळाच बंद ठेवल्या आहेत. तिसऱ्या लाटेत वयस्क आणि वृद्धांवर कोरोनाचा गंभीर असा परिणाम जाणवला नाही. लहान मुलांमध्येही कोरोना वाढल्याचे जिल्ह्यात आढळून आले नाही. शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गृहिणी असणाऱ्या माता मुलांना घरात बसून काही शिकवू शकतात. मात्र, शासकीय किंवा खासगी कर्मचारी असणाऱ्या महिलांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास विशेष असा वेळ नसतो. बालकांचा अभ्यास आणि त्यांचा विकास हा शाळेतच योग्यरित्या होऊ शकतो. यामुळे आता परिस्थिती अजिबात गंभीर नसल्यामुळे शाळा सुरूच व्हायला हव्यात, असे सोनाली लोखंडे या 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या. अशाच स्वरुपाची प्रतिक्रिया शहरातील अनेक पालकांच्याही आहेत.
काय म्हणतात बालरोग तज्ञ
कोरोनाची तिसरी लाट बालकांवर विशेष परिणाम करणारी नाही. सध्या तापाची साथ सुरू आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत पावणेतीनशेच्या आसपास बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, भीतीचे कुठलेही कारण नाही. अगदी साध्या तापासारखा हा प्रकार आहे. पालकांनी घाबरण्यासारखे कुठलेही कारण नाही. ज्या बालकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना घरीच विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे, असे बाल रोग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाले.
कोरोनाचे सध्याचे बालकांमधील प्रमाण अतिशय अल्प असून आता शाळा सुरू करण्यास कुठलीही हरकत नाही. शाळा बंद असल्यामुळे मुलांमध्ये विपरीत परिणाम झालेले पाहायला मिळत आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास खुंटला असल्यामुळे याचे विपरीत परिणाम मुलांमध्ये जाणवू शकतात. यामुळेच आता शाळा सुरू करण्यास हरकत नाही आणि कुठलीही भीती नसल्याचेही डॉ. जयंत नारळीकर म्हणाले. शाळा सुरू झाल्यावर मात्र विद्यार्थ्यांना मास्क लावणे आवश्यक असून, सॅनिटायझरचा वापरही सातत्याने करणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थी एकमेकांपासून अंतर ठेवूनच राहतील, याची काळजी शाळेने घ्यावी, असा सल्लाही डॉ. जयंत पांढरीकर यांनी दिला.
2 वर्षांत 9 हजार 481 बालकांना झाला कोरोना
अमरावती जिल्ह्यात एकूण 1 लाख 5 हजार 60 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 0 ते 10 वर्षे वयोगटात एकूण 2 हजार 981 तसेच, 11 ते 17 वर्षे वयोगटात एकूण 6 हजार 500 बालकांना कोरोना झाला. सध्यास्थितीत अमरावती जिल्ह्यात तीनशेच्या आसपास बालकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी अनेक बालक हे गृह विलगीकरणात आहेत.
हेही वाचा -Amravati woman Swab Test : तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, आरोपीला 10 वर्षाची शिक्षा