अमरावती -दीर्घकाळापासून वाढत जाणारे आजार, कुठल्याही उपचारांना प्रतिसाद देत नसलेले दुखणे. अंथरुणावर खिळलेले आयुष्य अशा क्लेशदायक आयुष्याच्या संध्याकाळचा सुखांत व्हावा. या उद्देशाने अमरावती शहरात डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाऊनच्या सहकार्याने पॅलिएटिव्ह स्थापन करण्यात आले आहे. वृद्धांच्या सुयोग्य शुश्रूषेसाठी ( proper care of elderly ) स्थापन करण्यात आले विदर्भातील हे पहिले आणि एकमेव पॅलिएटिव्ह केअर सेंटर ( Palliative Care Center Amravati ) आहे.
असे आहे वैशिष्ट्य -डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे अत्याधुनिक सोयींनी सज्ज विज खाटांचे वातानुकूलित आणि हवेशीर असे हे पॅलिएटिव्ह केअर सेंटर आहे. या ठिकाणी वृद्ध रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास सर्व व्यवस्था आहे. नर्स, रुग्णसेवक तसेच याठिकाणी वेळोवेळी डॉक्टरही उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये रुग्णांना शक्य असल्यास मोकळ्या आणि प्रसन्न वातावरणात दिवसभरातील काही वेळ घालविणे व प्रार्थना करिता उद्यानाची ही व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याकरीता याठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
यांना मिळू शकतो लाभ -पॅलिएटिव्ह सेंटरमध्ये आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ज्या रुग्णांना शुशृषेची गरज आहे, अशा रुग्णांना या ठिकाणी दाखल करता येते. अनेकदा काही कुटुंबाची तात्पुरती गरज म्हणून देखील एखाद्या रुग्णाला ठराविक दिवसांकरिता या सेंटरमध्ये ठेवता येऊ शकते. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत या सेंटरमध्ये गरजू रुग्णास दाखल करता येते. अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए.टी. देशमुख आणि रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विनायक कडू यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. दिवसाला पाचशे रुपये याप्रमाणे या केंद्रात वृद्ध आजारी व्यक्तींची शुश्रूषा केली जाते. विशेष म्हणजे हा खर्च सेवानिवृत्त झालेल्या गरजू रुग्णांना परवडणारा असून त्यांना या केंद्रात उत्तम असा मानसिक आनंद मिळू शकतो. तसेच त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना होणारा त्रास होणार नाही, असेही विनायक कडू म्हणाले.