अमरावती - विदर्भातील संत्री ही आंबट-गोड चवीमुळे जग प्रसिद्ध आहे. परंतु ज्या प्रमाणात संत्र्याला भाव मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते, त्याप्रमाणे भाव मिळताना दिसत नाही. यावर्षी शेतकऱ्यांनी आपली संत्री मातीमोल भावात अगोदरच व्यापऱ्यांना विकली. त्यामुळे कोरोनामुळे संत्र्याची मागणी वाढली असताना देखील आणि संत्र्याचे भाव वाढले असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. महाऑरेंज या संस्थेने मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला आहे.
कोरोनामुळे संत्र्याचं भाव वधारले.. जगभरातून संत्र्याची मागणी वाढली हेही वाचा...कोरोना इफेक्ट : १९ ते ३१ मार्चपर्यंत आगामी चित्रपटाचे शूटिंग रद्द
आंबिया बहारातील संत्र्याला फार समाधानकारक भाव मिळाले नाही. त्यात मृग बहरात संत्र्याला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ १० ते १२ हजार रुपये प्रतिटन संत्रा या भावात व्यापाऱ्यांना तो विकला. दरम्यान मागील तीन आठवड्यापासून जगावर कोरोनाचे सावट आहे. आणि संत्रामध्ये 'व्हिटॅमिन्स सी' असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे सध्या जभरातून संत्राला मागणी वाढली आहे.
असे असले तरिही याचा फायदा ज्या व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे संत्रा आहे, अशांनाच होत असल्याचा दावा महाऑरेंज संस्थेच्या श्रीधर ठाकरे यांनी केला. ठाकरेंच्या म्हणण्यानुसार संत्र्याला आता मागणी वाढली असल्याने 'आम्ही विदेशात संत्री निर्यात करत आहोत. साहजिकच संत्र्याचे भाव वधारले आहेत. आगामी काळात संत्र्याची मागणी अशीच राहल्यास प्रति टन ३५ -४० हजारपर्यंत संत्री विकला जाईल' असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा...'चिकन खाल्ल्याने कोरोना होतो,' अफवेचा फटका, कोंबड्यांच्या तब्बल तीन लाख पिल्लांसह दोन लाख अंडी केली नष्ट
मृग बहरात येणारी संत्री ही फेब्रुवारी महिन्याच्या अखेर किंवा मार्च १० पर्यंत शेतकरी विकून टाकतात. त्यानंतर उन्हाची चाहूल लागल्याने संत्रा खराब होण्याचे प्रमाण मोठे असते. त्या भीतीने शेतकरी संत्री अगोदरच विकतात. त्यामुळे आता संत्र्याचे भाव जरी वधारले असले, तरी शेतकऱ्यांकडे संत्री शिल्लकच नसल्याने या भाववाढीचा कोणताही फायदा हा शेतकऱ्यांना होणारा नसून तो व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.