अमरावती- कोरोनावर जोपर्यंत लस मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोना संबंधित व्यवस्थापन करूनच जगावे लागणार आहे. खरे तर कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात स्वॅब टेस्टिंग वाढवणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत व्यक्त केले.
अमरावती जिल्हा आणि विभागात कोरोनाची नेमकी परिस्थिती कशी आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी फडणवीस सोमवारी अमरावतीत आले होते. विदर्भ महाविद्यालय येथील विलगिकरण केंद्र, कोविड रुग्णालयाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्याकडून अमरावती विभागात कोरोना संबंधित त्यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र्रात रविवारी 5 हजार 300 कोरोना रुग्ण आढळले. मुंबई आणि राज्यात सर्वत्र स्वॅब टेस्टिंग कमी करण्यात आल्यामुळे हा आकडा कमी दिसत आहे. दिल्लीत 21 हजार कोरोना रुग्ण रविवारी आढळले आहेत. दिल्लीप्रमाणे आपल्याकडे स्वॅब टेस्टिंग अधिकाधिक करणे आवश्यक आहे. अमरावती विभागात सुद्धा स्वॅब टेस्टिंग वाढविण्यात यावी असे मी विभागीय आयुक्तांशी बोलल्याचे फडणवीस म्हणाले. विविध राज्य आणि जिल्ह्यातील लोक अमरावती, अकोल्यात येत असल्याने या दोन जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपण आता क्रिटिकल अवस्थेत आलो असून स्वॅब टेस्टिंग वाढविणे आवश्यक आहे. सोबतच इतर जिल्हा आणि राज्यातून आलेल्या लोकांना विलगिकरण कक्षात ठेवले तर कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.