अमरावती :ओडिसी नृत्य (Odissi dance style) ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा या ओडिसी नृत्याचा विशेष भाग होय. यामध्ये 'त्रिभंग' स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. तर विदर्भात, अमरावती शहरातील युवतीं हा ओडिसी नृत्य प्रकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर (reached the international level) सादर करीत आहेत. 'पंचायत राज प्रशिक्षण केंद्र' अमरावती येथे प्राचार्य पदावर असलेल्या, (Nari Shakti) शीतल मेटकर (Shital Metkar) यांनी अमरावती शहरात खऱ्या अर्थाने रुजवलेल्या 'ओडिसी नृत्य कलेच्या संस्कृतीमुळेच' अनेक युवती या नृत्य प्रकारात प्रवीण झाल्या आहेत.
शितल मेटकर यांचा नृत्य क्षेत्रातील प्रवास :बालपणी जिल्ह्यातील मोर्शी येथे शासकीय शाळेत शिक्षण घेत असताना दूरदर्शनवर कोणीतरी वाद्य वाजवत आहे आणि त्यावर युवती नृत्य करीत आहे. हा प्रकार सातत्याने पाहून नृत्याबाबत मला आवड निर्माण झाली, अशी माहीती शितल मेटकरी यांनी ईटीव्ही भारतला दिली. इयत्ता नववीत असतांना पूर्वाश्रमीच्या शीतल वाटाणे असणाऱ्या, शितल मेतकर या अमरावतीत आल्या आणि भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या त्यांच्या वडिलांनी त्यांना 'हेमंत नृत्यकला मंदिर' येथे सहज म्हणून, ओडिसी नृत्य शिकायला पाठविले. आणि येथूनच शितल मेटकर यांचा ओडिसी नृत्याचा दीर्घ प्रवास सुरू झाला. सुरुवातीला देशभरात आयोजित विविध स्पर्धेत शितल मेटकर यांनी नृत्य सादर केले. वकिलीचे शिक्षण घेत असतांना, त्यांनी मुंबईत सादर केलेल्या नृत्य प्रकाराबाबत, महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. आणि येथुनच ओडिसी नृत्य आपल्या आयुष्यात कायम ठेवावे असा ठाम निश्चय त्यांनी केला. वकिलीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे यदुराज मेटकर यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर माजी आमदार असणारे सासरे बबनराव मेटकर आणि सासूबाईंनी ओडिसी नृत्य सुरूच ठेव, असे प्रोत्साहन दिल्यावर 2002 मध्ये त्यांनी 'उत्कल कलानिकेतन' ची स्थापना केली. सुरुवातीला केवळ तीन-चार मुली ओडिसी नृत्य शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत होत्या. हळूहळू मुलींची संख्या वाढली. मधल्या काळात मुले झाल्यामुळे, काही वर्ष उत्कल कलानिकेतन बंद होते. 2014 पासून मात्र नव्या दमाने उत्कल कला निकेतन येथे युवती ओडीसी नृत्य प्रकार शिकायला आल्या. आज एकूण अमरावती शहरातील पाचशेच्या वर युवतींनी, शितल मेटकर यांच्या मार्गदर्शनात ओडिसी नृत्य प्रकार शिकला आहे. विशेष म्हणजे आपली कलाही आपल्याकडे शिकणाऱ्या मुलींच्या माध्यमातून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी; यासाठी शितल मेटकर यांचे सतत प्रयत्न राहिले आहेत.
2014 पासून घेतली भरारी :एका मैत्रिणीने पहिल्यांदाच अमरावती शहराबाहेर ओडिसी नृत्य कसे आहे, याचा परिचय करून दिला आणि यानंतर अमरावतीच्या बाहेर ओडिसी नृत्याचे जग कळायला लागले. 2017 मध्ये 'उत्कल कलानिकेतन' येथील ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींच्या चमूने सह्याद्री वाहिनीवर आपली नृत्य सादर केले. ओडिसी नृत्य हे महाराष्ट्राच्या मातीतल्या साहित्याशी जोडून; त्याचे वेगळे स्वरूप सगळ्यांसमोर मांडण्याचा नवा प्रयोग शितल मेटकर यांनी केला. यासोबतच बंगाली भाषेतील एकला चलो रे, गुजराती भाषेतील भजन, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सदा सुखी हो भारत देश हमारा, अशा प्रार्थनांवर ओडिसी नृत्य विविध ठिकाणी सादर करण्यात आले आणि या नव्या प्रकाराला मिळालेला प्रतिसाद माझ्यासह माझ्या विद्यार्थिनींना नवी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरला, असे शितल मेटकर म्हणतात.