अमरावती -अमरावती शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर राजुरा गावाच्या परिसरात उघड्यावरच लिंबाच्या झाडाखाली शाळा भरते. ही शाळा सर्वसामान्य शाळेसारखी नाही तर या शाळेत येणाऱ्या लहान मुलांच्या आईवडिलांनी तसेच, त्यापूर्वीच्या पिढीने कधी शाळाच पाहिली नाही. अशा समाजातील शाळाबाह्य विद्यार्थी या शाळेत संस्कार आणि नीतिमूल्याचे धडे घेत ( Amravati School For Backward Class Children ) आहेत. आपल्या समाजावर अशिक्षितपणाचा लागलेला बट्टा पुसण्यासाठी याच समाजातील सुशिक्षित झालेली निकिता पवार ( Amravati Nikita Pawar School ) या युवतीने आपली पिढी सुजाण सुशिक्षित बनविण्यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे.
अशी भरते ही शाळा
राजुरा गावालगत जंगल परिसरात दररोज तीस ते पस्तीस चिमुकल्यांची शाळा भरते. निकिता पवार ही युवती वडाळी आणि राजुरा परिसरातील फासेपारधी समुदायातील शाळाबाह्य चिमुकल्यांना ऑटोरिक्षातुन या शाळेत आणते. उघड्यावर असणाऱ्या या शाळेत तीस ते पस्तीस चिमुकले येतात.
याबाबत 'ई टीव्ही भारत'शी बोलताना निकिता पवार म्हणाल्या, आपली मुलंही शिकली पाहिजे यासाठी आमच्या समाजातील लोकांमध्ये फिरून बरेच दिवस जनजागृती करावी लागली. मी पदव्युत्तर पदवी घेतल्यावर शिक्षकी अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. अमरावती शहरातील नामांकित शाळेत मी शिक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागातही मी नोकरी केली. मात्र, आपल्या समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवीत यासाठी मी त्यांना स्वतःच्या संस्थेमार्फत शिक्षणासाठी मार्गदर्शन करीत आहे. माझ्या प्रयत्नांवर समाजातील लोकांचा विश्वास हळूहळू का होईना बसायला लागला आणि यामुळेच पालकांनी त्यांची मुले माझ्याकडे शिक्षणासाठी पाठवली.
अनेकांच्या मदतीतून मिळते ऊर्जा
वडाळी आणि राजुरा परिसरातील मुलांना गत सहा महिन्यांपासून शिकवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी चांदुर रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावातील 30 ते 40 चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. आतासुद्धा आमच्या समाजातील शेकडो चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मला आणायचे आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकांकडून मदत हवी असल्याचेही निकिता पवार यांनी म्हटलं आहे.