अमरावती -देशात कोरोनाने शिरकाव केला आणि अनेक उद्योगांना याचा फटका बसला. अनेकांचा रोजगार हिरावला तर अनेकांनी आपली नोकरीही गमावली. त्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला. कोणावर उपासमारीची वेळ आली तर कुणी आत्महत्या करून जीवनही संपवलं. अशा एक न अनेक घटना कोरोना काळात घडल्या. मात्र यातुन सावरत अनेकांनी मंदित संधी शोधून व्यवसायात नवनवीन प्रयोग करून उद्योग सुरू करत आत्मनिर्भर झाले आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे, अमरावती शहरातील दस्तुर नगरमध्ये राहणारा नीरज सोनार या तरुणांची. नीरज हा उच्चशिक्षित असून त्याने राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली होती. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर एका ठिकाणी खासगी नोकरी केली, तीही कोरोनाने हिरावून नेली. अशा परिस्थितीत खचून न जाता नीरज यांनी ऑरगाशुगर फूड ऑईल या नावाने शुद्ध लाकडी घाणीच्या तेलाचा व्यवसाय घरीच सुरू केला आणि हाच व्यवसाय त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे.
अमरावतीच्या दस्तुर नगरमध्ये राहणारे नीरज सोनार हे उच्चशिक्षित आहे. पूर्वी नोकरी मिळावी म्हणून नीरज यांनी तब्बल तीन-चार वर्ष महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी कंत्राटी पद्धतीने खाजगी नोकरीही केली. सर्व सुरळीत सुरू होत. पण देशात आणि राज्यात कोरोनाने शिरकाव केला आणि मोठ्या प्रमाणावर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा फटकाही नीरज यांना बसला, याच काळात नीरज यांचीही नोकरी गेली. त्यामुळे आता पुढे आयुष्यात काय करायचे? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर खेळ मांडू लागले. अशातच आता कुठेतरी नोकरीच्या मागे न लागता आपला व्यवसाय असावा, म्हणून नीरज यांच्या समोर तेल व्यवसायाचा पर्याय समोर आला. त्यात शेतकरी पुत्र असल्याने ग्राहकांना शुद्ध आणि नैसर्गिकरीत्या निर्मित तेल देण्याचा नीरज यांचा मानस होता. त्याच पार्श्वभूमीवर नीरज यांनी लाकडी घाणीच्या तेलाचा उद्योग सुरू करण्याचा ठरवलं. जवळपास सहा सात लाख रुपयांची जुळवाजुळव करून त्यांनी ऑरगाशुगर फूड ऑईल या नावाने हा लाकडी घाणीच्या तेलाचा गृहउद्योग सुरू केला. बाजारपेठच्या तुलनेत मिळत असलेलं शुद्ध तेल आणि ग्राहकांची असलेली विश्वासहर्ता यामुळे कमी काळातच नीरज यांनी आपल्या तेल उद्योगात कमालीचा जम बसवला आहे.
पाच प्रकारच्या तेलाची निर्मिती
नीरज यांच्या पारंपारिक लाकडी घाणीत तयार केलेल्या केमिकल्स मुक्त तेलाला मोठी मागणी आहे. नीरज हे शेंगदाणा, खोबरेल, जवस, मोहरी सह आदी प्रकारचे तेल आपल्या लाकडी घाणीतून काढतात. तेल शुद्ध असल्याने त्यांच्या तेलाला मागणी वाढली आहे. या तेलाच्या विक्रीतुन दर महिन्याला हजारो रुपयाचा नफा त्यांना मिळत आहे.
ग्राहकांच्या डोळ्यासमोर तेलाची निर्मिती