अमरावती- आणीबाणीच्या काळात आता दहा- वीस वर्षे देशात निवडणूक होणार नाही, असे वाटत होते. मात्र अवघ्या 18 महिन्यात झालेल्या निवडणुकीत जनतेने आमचा पराभव केला. या देशात नेत्यांनी नव्हे, तर सामान्य जमतेने लोकशाही टिकवली आहे. त्यामुळे लोकशाहीवर गदा येईल, असे मला वाटत नाही. आज अनेकांना लोकशाहीवर संकट आले आहे, असे वाटते. मात्र असे असेल, तर लोकशाही जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनता नवनीत राणा यांना विजयी करणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
आज अमरावतीत महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, की आज आपल्या देशाच्या शेजारी राष्ट्रांमध्ये लोकशाही लयाला गेली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्ये सैन्याने लोकशाही सरकार उलथविले आहे. भारतात अनेक राज्य, विविध धर्म, भाषा असणारे लोक राहत असूनही आपला देश लोकशाही प्रधान आहे. याचे सर्व जगाला आश्चर्य वाटत आहे. भारतात होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. त्याचे मुख्य कारण नरेंद्र मोदी हे आहेत. देशातील जाणकार म्हणतात, पुन्हा यांची सत्ता आली तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल. मला मात्र यावर अजिबात विश्वास नाही. आम्ही इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी पाहिली. मात्र देशातील सामान्य जनतेने या देशात लोकशाही टिकविण्याचे काम केल्याचे शरद पवार म्हणाले.
राज्यात भाजप- शिवसेना युतीच्या सत्तेत धनगर समाजाने वाईट अनुभव घेतला. मराठा क्रांती मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देऊ अशी घोषणा केली. अगदी त्याच वेळेस फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेले महाधिवक्ता श्रीहरी अणे हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन उच्च न्यायालयात मराठा आरक्षण मागे घ्या, अशी मागणी करतो ही सरसरळ फसवणूक आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मुस्लीम आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही दिवसात सत्ता बदलली आणि सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने मुस्लीम आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला नाही, असे शरद पवार म्हणाले.