अमरावती -अमरावतीचे कुलदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी मातेचे मंदिर आज सुमारे दीड वर्षानंतर नवरात्रोत्सवाच्या पर्वावर उघडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधासह अंबानगरी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ -
श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दोन्ही मंदिरात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. अंबादेवी मंदिराचे सचिव रवींद्र कर्वे यांच्याहस्ते ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक विधी केले जात आहेत.
कोरोना नियमांर्गत भाविकांना मंदिरात प्रवेश -
शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांतर्गतच भाविकांना दोन्ही मंदिरात प्रवेश दिला जातो आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाला नाका-तोंडावर मास्क असणे बंधनकारक असून मंदिरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सैनीटायझर मारले जात आहे. 60 वर्षांवरील वृद्ध तसेच दहा वर्षातील लहान मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे अंबादेवी संस्थानच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दर चार तासानंतर मंदिर बंद करून मंदिराचे सैनी डायजेशन केल्यावर मंदिरात पुन्हा भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो आहे.
मंदिरात ओटी, फुल, प्रसाद नेण्यास बंदी -
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांना ओटी, फुल, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी केवळ मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेऊन त्वरित मंदिराबाहेर निघणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -
नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी राजकमल चौक ते गांधी चौक या मंदिराकडे जाणार्या मार्गावर भाविकांची गर्दी सकाळपासूनच उसळली आहे. गर्दीला आवरण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी या दोन्ही मंदिरांमध्ये पोलीस तैनात आहेत.
सीमोल्लंघन सोहळा होणार साध्या पद्धतीने -
नवरात्राचे नऊ दिवस श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी मंदिरात साध्या पद्धतीने धार्मिक सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. अष्टमी आणि नवमीचा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने केला जाणार आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी यांच्या सीमोल्लंघनाचा सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला जाणार आहे. सीमोल्लंघनासाठी केवळ देवीच्या ऊत्सव मुर्ती वाहनांमध्ये बसवून शहराबाहेर साध्या पद्धतीने जाणार असल्याची माहिती श्री अंबादेवी मंदिर संस्थानचे सचिव दीपक श्रीमाळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - अमरावती : माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला; चांदूर रेल्वे शहरात तणाव