Navneet and Ravi Rana corona positive : खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana Corona Positive) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana Corona Positive) या दोघांनाही कोरोना झाला आहे. युवा स्वाभिमान महोत्सव, पंतगोत्सवात इतर नागरिकांशी संपर्क आल्याने आता राणा दांपत्यांना कोरोना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अमरावती -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana Corona Positive) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi rana Corona Positive) या दोघांनाही कोरोना झाला आहे. अस्वस्थ वाटत असल्यामुळे दोघांची कोरोना चाचणी केली असता दोघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी कोरोनाची पहिली लाटेत राणा दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर नागपूर आणि मुंबई येथे उपचार करण्यात आले होते.
युवा स्वाभिमान महोत्सवात अनेकांशी आला संपर्क
आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा 12 जानेवारीला 14 व्या स्थापना दिनानिमित्त युवा स्वाभिमान महोत्सवाचे (Yuva swabhiman Mahotsav) आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान हजारो नागरिकांचा संपर्क खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी आला. याच सोहळ्यादरम्यान राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठलीही परवानगी न घेता बसविला होता. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवताना तसेच सलग चार दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महाआरती चे आयोजन केले होते. यावेळीही शेकडो जणांचा संपर्क आमदार रवी राणा यांच्याशी आला. महापालिका प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर आमदार राणा यांच्या शंकर नगर येथील घरासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या संपूर्ण गदारोळात राणा दाम्पत्याचा हजारो जणांशी संपर्क आला होता. यानंतर ते दोघेही आजारी पडले आणि आज त्यांना कोरोना असल्याचा अहवाल समोर आला आहे.
पतंगोत्सवात चिमुकल्या कशाला संपर्क
14 जानेवारीला शहरातील न्यू हायस्कूल बेल्पुरा शाळेच्या मैदानावर आयोजित पतंगोत्सवात शेकडो चिमुकल्यांसह खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पतंग उडवली होती. यावेळी चिमुकल्यांसह अनेक नागरिक त्यांच्या संपर्कात आले होते त्यांनी सुद्धा काळजी बाळगावी असे आवाहन राणा दांपत्याच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन
आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने करण्यात आले आहें. दोघेही गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'