अमरावती- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची ६ जानेवारीला निवड झाली होती. त्यानंतर लगेच त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या बंगल्यावर त्यांच्या नावाची पाटी झळकली. दुसरीकडे दोन-अडीच महिन्यांपूर्वी सभापतीचे आमदार झालेल्या बळवंत वानखडे यांचा उल्लेख पाटीवर मात्र सभापती असाच आहे. यामुळे बळवंत वानखडे हे जिल्हा परिषदेचे सभापती की आमदार? असा प्रश्न अनेकांना भेडसावणार आहे.
अध्यक्षांची बदलली पाटी, आमदार मात्र सभापतीच! हेही वाचा -शाश्वत सिंचन योजनेतील ठिंबक योजनेचे अनुदान तातडीने द्या - अनिल बोंडे
6 जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. अध्यक्षपदावर काँग्रेसचे बबलू देशमुख यांची निवड झाली. तर, उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसाठी मालटेकडीलगत निवासस्थाने आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानावर लागलेली माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या नावाची पाटी तडकाफडकी काढून नवनियुक्त अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती म्हणून आमदार बळवंत वानखडे यांच्या नावाची पाटी मात्र अद्यापही एका इमारतीवर कायम आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक आटोपताच नवनियुक्त सभापतींच्या नावाची पाटी या इमारतीवर लागेल, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगितले जात होते. तरी अध्यक्षांसोबतच उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले विठ्ठल चव्हाण यांच्या ऐवजी उपाध्यक्षांच्या निवासस्थानावर माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्याच नावाची पाटी कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे केवळ बबलू देशमुख यांचा दबदबा असल्यामुळे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची पाटी तडकाफडकी बदलण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा परिषदेच्या अशा कारभारामुळे मात्र इतर पदाधिकार्यांचे नाव आणि त्यांच्या हुद्द्याबाबत सर्वसामान्यांच्या मनात मात्र संभ्रम कायम आहे.