अमरावती -भारतीय हवामान खात्याने या वर्षी मान्सून लवकरच ( Monsoon Update ) येणार असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार तो तीन दिवस आधी केरळमध्ये पोचला सुद्धा. मान्सूनची वाटचाल चांगल्याप्रकारे सुरू होती. कर्नाटकच्या बंगलोर, चिकमंगळूर या भागापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचला. सध्या तो गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे. सध्या हवामान परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मान्सूनची आगेकूच थांबली आहे. यामुळे 7 जून रोजी विदर्भात पोचणारा मान्सून आता 12 ते 15 जून दरम्यान धडकणार अशी माहिती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ प्रा. अनिल बंड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हवामान तज्ञाची प्रतिक्रिया अशी आहे मान्सूनची सध्या स्थिती - सध्या मान्सून हा गोव्यात थबकला असून सध्या अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नसल्यामुळे मान्सून थंडावला आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगवान उष्ण वारे वाहत आहे यामुळे मान्सून क्षीण झाला आहे. पुढच्या दोन दिवसात उत्तर भारत तसेच महाराष्ट्रातील तापमान कमी होण्याची शक्यता असून त्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मिळू शकतो. त्यानुसार भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 15 जून च्या कालावधीत मान्सूनचे विदर्भात आगमन होण्याची दाट शक्यता आहे असे प्रा. अनिल बंड म्हणाले.
पूर्व मान्सून पाऊस कोसळणार -विदर्भात मान्सूनचे आगमन लांबले आहे. मात्र 8 जून पासून विदर्भातील उष्णतेची लाट ओसरणार आहे. 8 9 आणि 10 जून रोजी विदर्भात मान्सून पूर्व पाऊस असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तापमान कमी होणार असून शेतकऱ्यांना मशागतीचे काम करणे सोपे जाईल असे प्रा. अनिल बंड यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका - हवामान खात्याने यावर्षी 103 टक्के पाऊस कोसळणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करणे योग्य राहील. पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करणे योग्य ठरणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैमध्ये चांगला पाऊस बरसणार असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने पेरणीचे नियोजन करावे असा सल्ला देखील प्रा. अनिल बंड यांनी दिला. शेतकऱ्यांनी आपली शेतीची मशागत पूर्ण केली असून सध्या बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. शेतकऱ्यांनी मात्र कृषी विद्यापीठाचे मान्यताप्राप्त बियाणे खरेदी करावे. गतवर्षी शेतांमध्ये लावलेल्या बियाण्यांचा रिझल्ट पाहून तसेच बियाणे खरेदी करावे. महागड्या बियाण्यांच्या खरेदीचा नाद शेतकऱ्यांनी टाळावा असे देखील प्राध्यापक अनिल बंड यांनी म्हटले.
हेही वाचा -Woman Fell Into Well : नाशिक पाणीटंचाईच्या झळा, पाणी भरताना महिला पडली विहिरीत