अमरावती - राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांचे काम सुखर, लवकर आणि स्मार्ट व्हावे या उद्देशाने तत्कालीन फडणवीस सरकारच्या महिला व बालकल्याण विभागा मार्फत (२०१९)मध्ये राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना हजारो रुपये किंमतीचे महागडे मोबाईल टॅब देण्यात आले होते. परंतु, हे मोबाईल टॅब अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे मोबाईल काय हँग पडत असल्याने आम्ही काम करू शकत नाही असही अंगणवाडी सेविका म्हणाल्या आहेत. दरम्यान, या सर्व महिला हे मोबाईल घेऊन बाल विकास विभागाच्या अधिकार्यांकडे परत करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आंदोलनही केले आहे.
आपल्या समस्या मांडताना अंगणवाडी सेविका 'हे मोबाईल काम करण्यासाठी योग्य नाहीत'
अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलमध्येच शासकीय नियमानुसार ऑनलाइन पद्धतीनेच नोंदी ठेवाव्यात. अन्यथा, मानधनातून कपात करण्यात येईल असे आदेश अंगणवाडी सेविकांना दिले आहेत. हे मोबाईल काम करण्यासाठी योग्य नसल्याने काम सतत बंद पडत आहे. त्यामुळे शासकीय लाभार्थ्यांची नोंदणीही करता येत नाही. असे या अंगनवाडी सेविकांचे म्हणने आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी आपले मोबाईल एकात्मिक बाल प्रकल्प विकास अधिकाऱ्यांकडे परत केले आहेत.
'माहिती मराठीमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी'
अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या अनेक महिलांचे शिक्षण वर्ग सातवी ते आठवीपर्यंत झाले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना इंग्रजीमध्ये माहिती भरणे फार जमत नाही. त्यामुळे काम करण्यास अडथळा येत असल्याची ओरड या महिलांनी केली आहे. पोषण आहाराची माहिती पोषण ट्रॅकवर इंग्रजीमध्ये भरावी लागते. परंतु, अनेक महिलांना ते जमत नसल्यामुळे ती माहिती मराठीमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अंगणवाडी सेविकांनी केली.