अमरावती- बिहार निवडणुका संपल्या की हे सरकार आपोआप पडणार असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. शिवसेना ही विरोधी पक्षात दिसेल, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर राज्यातील सरकार पाडून दाखवाच, असे थेट आव्हान विरोधकांना दिले. त्यावर राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधल्यानंतर विरोधकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात निव्वळ भाजपवर टीका केली आहे. शेतकऱ्यांविषयी ते तिथे एक शब्दही काहीच बोलले नाही.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत ते काहीच बोलले नाही. जाहीर केलेल्या दहा हजार रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे इंचभरही चांगले होणार नाही. शेतकऱ्यांना केवळ हेक्टरी दहा हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका आमदार राणा यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, की पंचवीस हजार रुपये हेक्टर व फळबागाला पन्नास हजार रुपये हेक्टर मदत देणे गरजेचे होते. त्यात मदतीची मर्यादाही दोन हेक्टरची केली. हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, हे लक्षात येत नाही.