अमरावती - शहरातील भीम टेकडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विदर्भातील लाखो अनुयायांसाठी तीर्थस्थळ आहे. याठिकाणी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेबांच्या उभारण्यात आलेल्या अष्टधातुच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री ज्यांना आम्ही बालकमंत्री म्हणायचो, कदाचित ते त्यांच्या जिव्हारी लागले होते. त्यांनी पोलिसांना हाताशी धरून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत आमच्याविरुद्ध विनाकारण गुन्हा दाखल केला होता, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणे हे कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही.... आमदार रवी राणा हेही वाचा...वाशिम ते वाघा बॉर्डर : शांतीचा संदेश देत ११ दिवसात सायकलपटू नारायण व्यास यांचा प्रवास
अमरावती शहरातील यशोदानगर लगतच्या भीम टेकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोणतीही परवानगी न घेता आमदार रवी राणा यांनी 14 एप्रिल 2018 रोजी उभारला होता. आमदार रवी राणा यांच्या या कृत्याचा अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी निषेध केला होता. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह युवा स्वाभिमान संघटनेच्या नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात गुरुवारी अमरावती न्यायालयात आमदार रवी राणा यांच्यासह इतरांनी आपली बाजु मांडली.
हेही वाचा...एखादा ज्योतिरादित्य सिंधिया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल, मुनगंटीवारांचा सरकारला टोला
न्यायालयातून बाहेर आल्यावर आमदार रवी राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे हे कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही. केवळ सूडबुद्धीने तत्कालीन पालकमंत्र्यांनी आमच्याविरुद्ध पोलिसांना कारवाई करायला लावली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कोणताही कायदा आड येत असेल, तर आम्हाला त्याची पर्वा नाही. या प्रकरणात न्यायालय योग्य असाच निर्णय घेईल, असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकरणात युक्तिवादासाठी 16 मार्चची तारीख न्यायालयाने निश्चित केली आहे.