अमरावती - भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा पाच वर्षात त्यांच्या नेत्यांनी काय कारणामे केले त्याबद्दल बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार झाला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे, असा प्रश्न महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपला केला आहे. आठ वर्षापूर्वी अमरावतीमध्ये एका चौकात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद झाला होता. त्यातून यशोमती ठाकूर यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लावली होती.
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला असून, मंत्री यशोमती ठाकूरसह अन्य दोघांना तीन महिन्याची शिक्षा व पंधरा हजारांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी भाजपने मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता यशोमती ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली असून, माझ्यासारख्या एका महिलेच्या राजीनाम्यासाठी आता भाजप मागे लागला असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा -BARC चा मोठा निर्णय, तीन महिन्यांसाठी 'टीआरपी' बंद
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भाजपने सुद्धा यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर उत्तर देताना, मी न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण, मी या प्रकरणी हायकोर्टात अपील केली आहे आणि तिथे आम्हाला नक्कीच न्याय मिळेल याचा विश्वास आहे. आता एका महिलेच्या मागे अख्खा भाजप लागणार. माझी भाजपच्या विचारधारे विरुद्ध लढाई आहे. आम्हाला कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढत राहू. भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली. पाच वर्षात त्यांच्या नेत्यांनी काय कारनामे केले त्याबद्दल बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार झाला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.