अमरावती -शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना रविवारी ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवसेना भाजप संघर्ष सुरू झाला आहे. ईडीने मंत्री अनिल परब यांना पाठवलेल्या नोटीसीवरून केंद्र सरकारवर टीका होत असतानाच आता राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील ईडीच्या नोटीसवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. विरोध पक्षाचा आवाज दाबण्यासाठी ईडी हे केंद्र सरकारचे अस्त्र आहे.
ज्या गोष्टीसाठी ईडी वापरली जाते, त्या गोष्टीसाठी ईडी वापरली जात नाही. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुलाच्या व नातेवाईकांच्या खात्यात लॉकडाऊननंतर एवढे पैसे कसे आले, याची चौकशी लागायला पाहिजे होती. पण ती लागली नाही. पण फक्त महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. म्हणून ते सरकार पाडण्यासाठी ईडी लावत असल्याचा गंभीर आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिली तर भाजप म्हणते अहवाल खोटा आहे. ईडीची मागणी केली तर ते बरोबर केंद्र सरकारच्या ज्या तपास यंत्रणा आहेत. त्यांनी निःपक्ष राहिले पाहिजे. तेथे काम केले पाहिजे पण भाजप असे का करते ते माहीत नाही, असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
नारायण राणे नैराश्यात गेल्यासारखे वागतात -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील मंत्री यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. परंतु मला असं वाटत ते आजकाल फार नैराश्याची भाषा वापरतात. ते नैराश्यात गेल्यासारखे वागतात.