अमरावती - राज्यात सध्या भोंगे लावण्यावरून राजकारण (Maharashtra Loudspeakers Controversy) तापले आहे. अशातच अमरावती शहर आणि जिल्ह्यात भोंग्यांची विक्री वाढली (Loudspeakers Sale Hike in Amravati) आहे. अमरावती जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसात 25 ते 30 टक्के भोंग्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे एकप्रकारे भोंगे विक्रेत्यांसाठी आता अच्छे दिन आले असेच म्हणावे लागेल.
असे आहे भोंगे विक्री वाढण्याचे कारण - सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात दरवर्षी भोंग्यांची विक्री बऱ्यापैकी असते. यावर्षीसुद्धा रमजान निमित्ताने भोंग्याची विक्री तेजीत आहे. यासोबतच हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरासह ग्रामीण भागात भोंग्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती अमरावती शहरातील जोशी ब्रदर्स या साऊंड सिस्टिम प्रतिष्ठानचे संचालक राम जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात भोंग्यांची विक्री करत असतात. ही विक्री का वाढली आहे सर्वांनाच ठाऊक असले तरी सध्या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील बांधव भोंग्यांच्या खरेदीवर भर देत असल्याचेही राम .जोशी यांनी सांगितले. अतिशय साध्या स्वरूपाच्या भोंग्याचा सेट अडीच हजार रुपयांचा असून, चांगल्या दर्जाचा भोंग्याची किंमत पंधरा हजारापासून सुरू होते, असेही राम जोशी म्हणाले.