अमरावती - अमरावती महापालिकेचे एकमेव पर्यटन उद्यान अशी ओळख असणाऱ्या वडाळी उद्यानाच्या तिकीट घरात सध्या दारूची विक्री सुरू आहे. कोरोनामुळे उद्यान बंद आहे, तर उद्यानाचे कंत्राट संपुष्टात आल्याने कंत्राटदार उद्यान सोडून निघून गेले आहेत. अशातच उद्यानात सध्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे.
शहरातील फ्रेजारपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळी परिसर येतो. या परिसरात अवैध दारू विक्री, जुगार आणि वरली मटका खुलेआम सुरू असतो. परिसरातील काही नागरिकांनी नुकतीच बदली झालेल्या पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची कधीही गांभीर्याने दखल घेतली नाही. यामुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांची मजल थेट महापालिकेच्या उद्यानासमोर दारू विक्री करण्यापर्यंत जाऊन पोहचली. उद्यानात असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या उद्यानात काय सुरू आहे, याची दखल घेण्याची तसदी घेतली नसल्याचे समोर आले आहे.