अमरावती - वृद्ध सासऱ्याची काठीने हल्ला चढवून हत्या करणाऱ्या जावयास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ७ जून २०१६ रोजी खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबा खोलापूर येथे घडली होती.
सासरे जावई राहायचे एकत्र - राजू दिगांबर उमप (५३) रा. कसबा खोलापूर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजू, त्याची पत्नी व सासरे नामदेव चांदूरकर (७५) हे कसबा खोलापूर येथे एकत्र राहत होते. नामदेव चांदूरकर यांची मुलगी मानसिकदृष्ट्या आजारी होती. घटनेच्या दिवशी ७ जून २०१६ रोजी राजू व सासरे नामदेव यांच्यात वाद झाला. या वादात राजूने सासरे नामदेव यांच्यावर काठीने हल्ला चढविला. यात नामदेव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेजारी राहणारे राजेंद्र बकाराम कांडलकर यांनी खोलापूर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी राजूविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.