अमरावती -अमरावती शहरातील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ( Leopard Seen At Shri Shivaji Agriculture College ) परिसरात गत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या आढळून आल्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली असतानाच हा बिबट महाविद्यालय परिसरातील दाट झाडाझुडपातून लोकवस्तीच्या भागात येऊ नये, याबाबत वनविभागाकडून दक्षता घेतली जात आहे.
महाविद्यालयाच्या परिसरात ठेवला पिंजरा -श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात बिबट असल्याचे महिनाभरापासून बोलले जात होते. मात्र, यावर कोणाचाही विश्वास नव्हता, असे असताना महाविद्यालयातील कर्मचारी प्राध्यापक तसेच प्राचार्यांना बिबट्याचे दर्शन घडल्यावर महाविद्यालयाच्या परिसरात बिबट असल्याची खात्री सर्वांना पटली. विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा हा बिबट आढळून आला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्यावतीने महाविद्यालयाच्या परिसरात पिंजरा ठेवण्यात आला असून कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
कृषी महाविद्यालयातील जनावरांना धोका -श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने गाई-म्हशी, बकऱ्या यांच्यासह कोंबड्या बदक आदी पक्षी आहेत. या भागात सध्या बिबट्याचे वावर असल्यामुळे जनावरांसाठी मोठा धोका निर्माण झाला असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार चिखले 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कर्मचारी वसाहतीत निर्माण झाली भीती -महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या कर्मचारी वसाहतीत सहा ते सात कर्मचारी कुटुंबे राहतात. कर्मचाऱ्यांच्या वसाहती लगतच अनेकदा बिबट्या आढळून आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्री आठ नंतर या वसाहतीतील प्रत्येक घराचे दार बंद होते. तर सकाळी दिवस उजाडला वरच घराची दारे उघडली जात आहे. विशेष म्हणजे या परिसरात नेहमीच डुकरांचा त्रास असायचा मात्र गेल्या आठ पंधरा दिवसांपासून या परिसरात एकही डुक्कर आढळून आले नाही. तसेच कुत्र्यांची संख्यादेखील कमी झाली असल्याचे कर्मचारी वसाहतीत राहणारे श्रावण चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या क्रीडा मैदानावर सकाळी फिरायला येणाऱ्यांची गर्दी कमी झाली असून सायंकाळी या भागात बिबट्याच्या भीतीमुळे कोणीही येत नाही.
लोकवस्तीत बिबट शिरण्याची भीती-अमरावती-नागपूर मार्गावर असणाऱ्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालया लगत पंचवटी, राधा नगर, अर्जून नगर, आयटीआय कॉलनी असा मोठ्या लोकवस्तीचा परिसर आहे. सध्या महाविद्यालयाच्या पाचशे एकर पसरलेल्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून हा बिबट्या लगतच्या लोकवस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिबट लोक वस्तीत शिरला तर बिबट्याच्या जिवालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे प्राध्यापक अनिल बंड, प्रा. डॉ. नंदकिशोर खंडारे, यांनी म्हटले आहे.
वनअधिकारी म्हणतात घाबरण्याचे कारण नाही -अमरावती शहरालगत असणाऱ्या पोहरा जंगलातून हा बिबट श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आला आहे. या बिबट्याला पकडण्याची तयारी आम्ही केली आहे. असे असले तरी बिबट नेहमीच नव्या वस्तीचा शोध घेण्यासाठी येत असतो. हा बिबट या परिसरात जास्त दिवस राहणार नाही. 15 दिवसात तो इथून निघून जाईल. त्यामुळे भीतीचे कुठलेही कारण नाही, असे वनविभागाच्या रेस्क्यु टीमचे वनपाल अमोल गावनेर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा -निवडणुकीला काही तासांचा अवधी; ट्रायडंटमध्ये आदित्य ठाकरे, संजय राऊत ठोकणार तळ