अमरावती -खाकी वर्दीतला आपला दरारा बाजूला सारून अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांसाठी काल सायंकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला. वसंत हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह पोलीस आयुक्त अगदी झिंगाट रंगून गेल्या होत्या.
हेही वाचा -अमरावती-नागपूर महामार्गावर पोलीस सज्ज; शेतकरी करणार 'चक्का जाम'
पोलीस आयुक्तांनीही धरला ताल
हळदीकुंकू कार्यक्रमात विविध खेळ, उखाणे स्पर्धांसाठी महिला नाचण्यात आणि गण्यातही रंगून गेल्या. झिंगाट गाणे सुरू होताच उपस्थित महिलांसोबत पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी गाण्यावर ताल धरताच वसंत हॉल मधील वातावरण अगदी झिंगाट होऊन गेले.
फुगे फुगवा शर्यतीने वेधले लक्ष
पोलीस आयुक्त आरती सिंह आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात रंगलेली फुगे फुगविण्याची शर्यत विशेष आकर्षण ठरली. फुगे फुगविण्यात यशोमती ठाकूर यांनी बाजी मारल्यावर हास्य विनोदाने कार्यक्रम आणखी रंगला.
..यांची होती उपस्थिती
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, उपमहापौर कुसूम साहू, माजी आमदार सुनील देशमुख यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या पत्नी वैशाली सातव, पोलीस उपायुक्त साळी यांच्या पत्नी ऐश्वर्या साळी, पोलीस निरीक्षक निलिमा आराज, सीमा दाताळकर, श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आदी महिला उपस्थित होत्या. या सोहळ्याचे संचालन क्षिप्रा मानकर, लीना अलकरी आणि सुषमा अर्डक यांनी केले.
हेही वाचा -धक्कादायक! अमरावतीत खासगी डॉक्टरच्या कुटुंबीयांचे देखील लसीकरण?