अमरावती - नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेला सैराट चित्रपट येऊन तीन वर्षे उलटून गेले असले तरी खऱ्या जीवनातील सैराट मात्र अद्यापही समाजात कायम आहे. प्रेम प्रकरणातून आपल्या अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा रागात अल्पवयीन भावाने आपल्या बहिण्याच्या प्रियकराला गावात येताच जिवे मारल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेस्वर या गावात घडली आहे. बहीण प्रियकरासोबत गावात येताच मित्रांना सोबत घेऊन, त्याला गावबाहेर नेले व तेथे चाकुने वार करून त्याला दुचाकीवर परत गावात आणून भरचौकात फेकून हत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. ही घटना कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमला विश्वेश्वर येथे काल रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. यात तीन अल्पवयीन आरोपींसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर तिवसा व चांदुर रेल्वे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लाथा बुक्कीने मारत चाकूचेही त्याच्यावर वार केले
अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदुरे वय. २२ वर्ष रा. चांदुर रेल्वे अस हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा उत्कृष्ट कबड्डीपटू खेळाडू होता. अक्षय आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील अल्पवयीन मुलगी प्रेमप्रकरणातुन काही दिवसांपूर्वी पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पकडले होते. मात्र, युवतीने आम्ही मर्जीने गेली होतो असे पोलिसांसमोर सांगितले होते. दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याने अक्षयवर गुन्हा दाखल झाला होता. अक्षय काल रात्री आमला विश्वेश्वर येथे गावात आला. त्यानंतर या मुलीच्या भावाला अक्षय आला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आपल्या बहिणीला पळवून नेवून नेल्याचा राग त्याच्या मनात होता. त्यानंतर त्याने आमला विश्वेश्वर येथील आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन अक्षयला भिवापूर रोडवर दुचाकीवर नेत त्याला लाथा बुक्कीने मारत चाकूचेही त्याच्यावर वार केले. इतकेच नाही तर नंतर त्याला आमला विश्वेश्वर येथे गावात नेत भरचौकात फेकून दिले. यानंतर अक्षयला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव जास्त होत असल्याने नागपुरात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यानंतर यातील तीन अल्पवयीन युवकांस सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.