अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील गावकऱ्यांनी मागासवर्गीय समाजाचा शेती वहीवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेची सोयाबीन गंजी पेटवून दिली होती. गावकऱ्यांकडून सतत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून गावातील १०० मागासवर्गीय लोकांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतला होता. त्यामुळे या घटनेची चर्चा राज्यात पसरली होती. या घटनेची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी गावात जाऊन अन्यायग्रस्त पीडितांशी संवाद साधला व शेतीची पाहणी केली. यावेळी आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी महसूल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, 'प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर अशी घटना घडली नसती', अशी प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी दिली. पीडित अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तातडीने शेतीच्या वहिवाटीचा रस्ता द्यावा, अन्यथा संंबंधित प्रशासनावर कारवाई करू, असा इशारा अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी दिला.
असे आहे प्रकरण -
चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील मागासवर्गीय बांधवांना त्यांच्या शेत शिवारात जाणारा पिढीजात रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे दलित शेतकऱ्यांना शेतीत मशागत करणे अशक्य झाले. तसेच पेरणीच्या वेळी त्यांचा ट्रॅक्टर अडवून जातीवाचक शिवीगाळ करण्याचा प्रकार गावात घडल्याने याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने संबंधितांवर ग्रामस्थांचा अत्याचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर 18 ऑक्टोबरला निखिल चांदणे या व्यक्तीच्या शेतातील सोयाबीन गावातील लोकांनी एकत्र येत पेटवून दिले. या घटनेमुळे गावात तणाव वाढला. आमच्यावर अन्याय होत असतानाही प्रशासन आमची दखल घेत नसल्याचा आरोप करीत दानापूर येथील मागासवर्गीय समाजातील 100 जण गाव सोडून गावालगतच्या पाझर तलावात मुक्काम ठोकला. त्या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.