अमरावती -मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पेढे नदीचे पाणी थेट सावरखेड गावात शिरले. ( Amravati Flood Affected Villages ) नदीकाठी असणाऱ्या सुमारे 50 घर अक्षरशः पाण्यात बुडाल्यामुळे घरात होते नव्हते ते धान्य, किराणा, कपडे वाहून गेले. गावाला जोडणाऱ्या नदीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा अमरावती शहराशी असणारा संपर्कच तुटला. अशा परिस्थितीत गावात रेशनचे धान्य येणे देखील बंद झाले. अशा परिस्थितीत उपासमारी सहन करणाऱ्या या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अमरावती हॉटेल असोसिएशन पुढाकार घेतला. या एकूण 50 कुटुंबांना आठ दिवस जेवणाची चिंता राहणार नाही. इतके धान्य आणि किराणा साहित्य मदत स्वरूपात दिले. शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसताना आठ दिवसाच्या जेवणाची सोय झाल्यामुळे या सर्व पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुरामुळे गावात हाहाकार -अमरावती शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावात तीन आणि चार जुलै रोजी मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हाहकार उडाला. गावालगत वाहणाऱ्या पेढे नदीला पूर आला आणि गावाला जोडणाऱ्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा जगाशी संपर्क ( Amravati Flood Affected Villages ) तुटला. गावातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या 70 ते 80 घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले. यापैकी एकूण 50 घरातील धान्य, कपडे, किराणा असे सारेच काही वाहून गेले. डोळ्यातील अश्रूंशिवाय या गरीब कुटुंबीयांकडे काही एक उरले नाही. गुरुपौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी देखील घरात खायला काहीही नव्हते. पुरामुळे अक्षरशः होत्याचे नव्हते झाल्यामुळे अख्ख्या सावरखेड गावात नैराश्य पसरले.
गावात सर्वत्र पाणीच पाणी -पेढी नदीला आलेल्या पुरामुळे सावरखेड गाव पूर्णतः पाण्याखाली आले. गावात सर्वत्र पाणीच पाणी शिरल्यामुळे कोणाला कोणाचीही मदत करता आली नाही. गावात असणाऱ्या एकमेव चक्कीतही पाणी शिरल्यामुळे ही चक्की आज देखील बंदच पडून आहे. आता पाणी ओसरले असले तरी गावात सर्वत्र चिखल माखला आहे.
गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून -सावरखेड गावाला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला. पेढे नदीवरील पुलानाजी रस्ता वाहून गेल्याने या ठिकाणी मला मोठा खड्डा पडला. ग्रामस्थांनी ह्या खड्ड्यात कसेबसे दगड टाकल्यामुळे आता ह्या मार्गावरून केवळ पायी जाता येते. गावात मोठे वाहन देखील आता येऊ शकत नाही तसेच गावात अडकलेले चार चाकी वाहन बाहेर निघणे सध्या तरी अशक्य आहे.
हॉटेल असोसिएशनला ही करावी लागली कसरत - पुरामुळे सावरखेड गावातील उपाशी कुटुंबीयांना आठ दिवस पुरेल इतक्या अन्नसाठाची मदत करण्यासाठी सरसावलेल्या अमरावती हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी धान्य आणि किराणा घेऊन सावरखेड गावापर्यंत पोहोचले असताना त्यांचे वाहन गावात शिरू शकले नाही. यामुळे गावापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर वाहन उभे करावी लागली. गावातून असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेल्या ऑटो रिक्षामध्ये ठेवण्यासाठी हॉटेल असोसिएशनच्या वाहनातील किराणा धान्याच्या पिशव्या काढून दुसऱ्या बाजूला हातात उचलून पायी चालत नेण्यात आल्या. गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी साचले असल्यामुळे या पाण्यातूनच हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करत चालत यावे लागले.