अमरावती -अमरावती शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून ( Heavy rain in Amravati district ) मुसळधार पाऊस कोसळत आहे. 18 जून रोजी अमरावती जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळल्यावर पहिल्यांदाच आज संततधार पाऊस बरसतो आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या या पावसामुळे संपूर्ण जिल्हा चिंब ओला झाला आहे. 18 जुलैला मान्सूनचा पहिला पाऊस अमरावती जिल्ह्यात कोसळल्यावर आतापर्यंत अधूनमधून दोन ते तीन वेळा पावसाच्या सरी अमरावती शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बरसल्या होत्या. संततधार पावसाची प्रतीक्षा अमरावतीकरांना असताना उशिरा का होईना मात्र आज जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस कोसळत आहे.
हेही वाचा -भाजपच्या वतीने उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली; अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा -अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 20 जून नंतर शेतात पेरणी केली. आता दमदार पाऊस होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. हवामान खात्याने सुद्धा 20 जून नंतर सलग पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला होता. पावसाने मात्र अचानक दडी दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरले होते. पुन्हा पेरणी करावी लागेल का? अशी भीती शेतकऱ्यांना असताना आज अखेर सर्व दूर चांगला पाऊस बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.