अमरावती -भारताच्या स्वातंत्र्यदिवस तसेच गणतंत्रदिनाच्या (Independence Day and Republic Day) पर्वावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चिन्हांची भेट देण्याची परंपरा अमरावती शहरातील संत कबीर राम विद्यालयात शारीरिक शिक्षक असणारे संतोषकुमार अरोरा यांनी 29 वर्षांपासून जोपासली आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे.
..अशी झाली सुरुवात -
मुळात खेळाडू असणारे संतोषकुमार अरोरा यांना देशाप्रती अत्यंत आदर आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना छोट्या आकारातील कागदाचे राष्ट्रीय ध्वज भेट स्वरूपात द्यावे अशी कल्पना त्यांना 1993 मध्ये सुचली. 26 जानेवारी 1993 ला त्यांनी वीस रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज खरेदी केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी या राष्ट्रध्वजाचे वितरण केले. यानंतर 15 ऑगस्ट 1993 रोजी सुद्धा त्यांनी अशाच स्वरूपाचे कागदाचे राष्ट्रीय ध्वज खरेदी करून शाळेतील विद्यार्थ्यांना वितरीत केले. येथूनच स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर संतोष कुमार अरोरा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह अमरावती शहरातील विविध शाळा आणि तालुका स्तरावरील शाळेत राष्ट्रीय चिन्हांचे वितरण करीत आहेत.
राष्ट्रीय सणाच्या पर्वावर राष्ट्रीय चिन्हांची भेट पाच लाख विद्यार्थ्यांना वितरित केले राष्ट्रीय चिन्ह - 26 जानेवारी 1993 पासून हा उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला माझ्या संत कंवरराम विद्यालयातील विद्यार्थ्यांनाच मी राष्ट्रीय प्रतीक असणारे कागदाचे ध्वज वितरित करायचो. मात्र दोन तीन वर्षातच आपल्या शाळेसह अमरावती शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर राष्ट्रीय ध्वजाचे वितरण करण्यास सुरुवात केल्याचे संतोष कुमार अरोरा 'ई टीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. अमरावती शहरातील विविध शाळांत सोबतच जिल्ह्यातील भातकुली आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील शाळा तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चिन्हांचे वाटप मी केले असून जवळपास साडेचार ते पाच लाख असे राष्ट्रीय चिन्ह मी विद्यार्थ्यांना वितरित केले असल्याचे संतोष कुमार अरोरा यांनी सांगितले.
मंत्री आणि जिल्हाधिकार्यांना तिरंगी फेटा -
स्वातंत्र्यदिन आणि गणराज्य दिनाच्या पर्वावर शहरातील जिल्हा स्टेडियम येथे आयोजित सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्यांना माझ्या वतीने तिरंगी फेटा दिला जातो. तसेच जिल्हा स्टेडियमवर उपस्थित अधिकारी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चिन्हांचे वाटप केले जात असल्याचेही संतोष कुमार अरोरा म्हणाले.
लॉकडाऊनमध्ये सफाई कामगारांचा सन्मान -
लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना राष्ट्रीय सणाच्या पर्वावर अमरावती शहरातील विविध प्रभागात सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना मी राष्ट्रीय प्रतीकांचे वाटप केले. कोरोना काळात सफाई कामगारांनी दिलेले योगदान राष्ट्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे संतोष कुमार अरोरा म्हणाले.
राष्ट्रीय चिन्हांचे असे बदलले स्वरूप -
1993 ला लहान आकारातील कागदाचा तिरंगा संतोष कुमार अरोरा यांनी विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यास सुरुवात केली. पुढच्या काळात मात्र कागदाच्या तिरंगा ऐवजी लहान आकारातील धातूचा तिरंगा तसेच विविध आकारातील धातूचा तिरंगा तसेच लहान आकारातील तिरंग्याचे झुंबरही संतोषकुमार अरोरा यांनी वितरित केले. सुरुवातीच्या काळात कागदाचा तिरंगा वितरित करण्यासाठी वीस रुपये खर्च यायचा मात्र आता दोनशे राष्ट्रीय प्रतीक वितरित करण्यासाठी 20 हजार रुपयापर्यंत खर्च येत असल्याचे संतोष कुमार अरोरा म्हणाले. हा संपूर्ण खर्च मी स्वतः करतो आणि राष्ट्रीय प्रतिकांचे वितरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा हिशेब ठेवणे मला कधीही पटले नाही, असेही संतोषकुमार अरोरा यांनी स्पष्ट केले.