अमरावती: कोरोनामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अगदी रक्ताचे नातेवाईकसुद्धा आपल्या आप्तस्वकीयांच्या अंत्यसंस्कारासाठी पाठ फिरावतानाचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे माणूसकी ओशाळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, कोरोनाच्या या भयावह काळात नातेवाईकांनी अंत्यसंस्काराला पाठ फिरवली असली, तरी अनेक सामजिक कार्यकर्ते मात्र सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काही देवमानसांनी पुढाकार घेत "माणुसकी संघ" नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.
स्वखर्चातून आजपर्यंत दहा-बारा रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पाडले पार
दर्यापूर येथील एकता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर इकबाल पठाण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील काही युवकांनी एकत्र येत "माणुसकी संघ" नावाने एक चमू तयार केला आहे. तालुक्यात कोठेही कोरोनाने मृत व्यक्तीचा विधिवत अंत्यसंस्कार करून, सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवले आहे. कोरोनाच्या भीतीने मृतदेहाच्या जवळसुद्धा कुणीही जायला तयार नाही. परंतु या तरुणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सूरु केलेल्या या उपक्रमांची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. या उपक्रमाद्वारे स्वखर्चातून आजपर्यंत दहा-बारा रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.