अमरावती -भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठी राजकीय पार्टी आहे. भाजपाला कुठेही कोण्या दुसऱ्या खासदाराची किंवा आमदाराची गरज नाही, असे असले तरी काही लोक पक्षात घुसायचा प्रयत्न करतात. आमच्या नेत्यांच्या पाया पडतात. आमच्या नेत्यांसोबत फोटो काढून त्याद्वारे इतरांना ब्लॅकमेल करतात, असा आरोप जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी अपक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या राणा दाम्पत्यावर नाव न घेता केला आहे. राणा यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात बुधवारी अमरावतीच्या जयस्तंभ चौकात भाजपच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी प्रवीण पोटे यांनी राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवली.
पोटे यांचा राणा दाम्पत्यावर आरोप महापालिकेत राणांच्या कार्यर्त्यांनी धुडगूस घातल्याचा निषेध-अमरावती महापालिकेच्या मासिक आमसभेदरम्यान राणा यांच्या युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात अनधिकृत प्रवेश करून गोंधळ घातला होता. महापालिकेत कुशल आणि अकुशल कामगार भरतीबाबत नेमलेल्या एजन्सीच्या विषयावरून युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला होता. याप्रकरणात महापालिकेतील सर्व पक्षीय नेत्यांनी निषेध नोंदविला तसेच महापौर चेतन गावंडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. दरम्यान युवस्वाभिमान पार्टीच्या या कृत्याच्या निषेधात भाजपच्या वतीने जयस्तंभ चौक येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रविण पोटे यांनी राणा दाम्पत्याच्या वागण्याची पोलखोल करत त्यांचे नाव ने घेता सडकून टीका केली.
महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन राणा दाम्पत्य जबरदस्तीने भाजप नेत्यांना भेटत-राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त अमरावतीत आले होते. त्यावेळी देखील आमदार रवी राणा यांनी फडणवीस यांचा ताफा राजापेठ चौक येथे अडवून त्यांच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढला. हा फोटो आता व्हायरल करून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत अंडरपासच्या उद्घाटनाला आले, अशी खोटी माहिती पसरविण्याचा उद्योग रवी राणा करीत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला.
खासदार राणांची दिल्लीत केवळ नौटंकीलोकसभेचे काम सुरळीत होऊ द्यावे यासाठी विरोधकांना समजूतदारी शिकविण्याचे फलक दाखवून नौटंकी करण्याचे काम खासदार राणा दिल्लीत करतात. अमरावती महापालिकेच्या सभागृहात त्यांचे कार्यकर्ते गोंधळ घालतात. या अशा दुटप्पी वागण्याचा भाजप निषेध करते, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यांची होती उपस्थिती- युवस्वाभिमान पार्टीच्या निषेधात भाजपने केलेल्या आंदोलनाला महापौर चेतन गावंडे, आमदार प्रवीण पोटे, भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर, नगरसेवक तुषार भारतीय, उपमहापौर कुसुम साहू, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रा. रवींद्र खांडेकर,जयंत देहणकार, सुरेखा लुंगारे, नूतन भुजाडे, सुनील काळे, मिलिंद बांबल, बदल कुळकर्णी, शिल्पा पाचघरे आदी शेकडॉ कार्यकर्ते उपस्थित होते.