अमरावती - मागील सात वर्षांपासून देशात अरेरावीची राजकारण सुरू आहे. गेल्या दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र सरकार त्यांच्यासोबत चर्चा करायला देखील तयार नाही. या गोष्टीचे दुःख वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. दरम्यान, काल(दि. 4 ऑक्टोंबर)रोजी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनात असलेल्या शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी घातल्याने चार आंदोलक शेतकऱ्यांसह इतर चार असे आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा मंत्री ठाकूर यांनी यावेळी तीव्र निषेध केला.
शेतकऱ्यांना त्यांचा माल विकू द्यायचा नाही का?
आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी त्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. परंतु, केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. देशात फक्त दोनच मोठे व्यापारी आहेत का? असा सवालही मंत्री ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकू द्यायचा नाही का? त्यांना व्यापार करू द्यायचा नाही का? असा सवालही मंत्री यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. दरम्यान, मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सरकारच्या अरेरावीचा निषेध केला पाहिजे अशी प्रतिक्रिया ही यशोमती ठाकूर यांनी दिली..
मंत्रिमंडळात मदतीचा लवकरच निर्णय होईल
शेतकऱ्यांचे पावसामुळे जे काही नुकसान झाले आहे त्या यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाईल. सोबतच, शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय घेतला जाईल असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आला असल्याची माहिती दिली होती. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: गावोगाव दौरे करून पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते व याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला होता