अमरावती- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. यामध्ये बेड, रुग्णालये यांच्या अभावामुळे अनेक कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत अमरावतीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यामुळे अमरावतीचा मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढला होता. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विदर्भातील एकमेव आणि पाहिले असे विदेशी तंत्रज्ञानावर आधारित असलेले पी-फॅब्र कोविड रुग्णालय अमरावतीत उभारण्यात आले आहे. दहा हजार चौरस फुटावर तयार झालेले हे रुग्णालय आता लवकरच सेवेत उपलब्ध होणार आहे.
विदेशी तंत्रज्ञानाचा वापर, अमरावतीमध्ये साकारले विदर्भातले एकमेव प्री-फॅब्र कोविड रुग्णालय - अमरावती कोरोना रुग्णालय
अमरावतीच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बाजूला हे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. लवकरात लवकर या रुग्णालयाचे काम पूर्ण व्हावे या उद्देशाने मॉड्युलर हाऊसिंग या कंपनीच्या 14 तज्ञासह अनेक कामगार इथं रात्रंदिवस काम करत आहेत. काही दिवसांतच हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यात येणार असून तामिळनाडू येथून आलेल्या तज्ञांच्या देखरेखी खाली त्याची उभारणी करण्यात आली आहे. यात आर्किटेक्चर अब्दुल शुकोर यांच्या मार्गदर्शनात तेरा लोकांची टीम येथे काम करत आहे .
या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 40 फुटाचे वातानूकुलीत मॉडेल असणार आहे. आयसीयुच्या दोन युनिटची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आठ बेडची व्यवस्था असणार आहे. तसेच डॉक्टरांसाठी स्टाफरूम व स्वतंत्र टॉयलेट बाथरूमही प्रत्येक मॉडेलला जोडले आहे. तसेच या रुग्णालयासाठी वाहनतळ आदींची सुविधा ही उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णालयात विविध ठिकाणी वातानूकुलीत, तसेच पंखे हे सुद्धा लावण्यात आले आहेत.
वीस ते पंचवीस वर्षापर्यंत या रुग्णालयाची मर्यादा असणार आहे-
अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या या पी-फॅब्र रुग्णालयाची कालमर्यादा तब्बल वीस-पंचवीस वर्षापर्यंत असणार आहे. पंचवीस वर्ष हे रुग्णालय रुग्णांसाठी फायद्याचे ठरणार आहे.