शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा अमरावतीत कोविड रुग्णालयात विनामास्क घुसण्याचा प्रयत्न.. - अमरावतीत कोविड रुग्णालयात विनामास्क घुसण्याचा प्रयत्न
कोरोना व्हायरसचा वाजागाजा सरकार करत असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आज अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये विनामास्क घुसण्याचा प्रयत्न केला.
अमरावती - राज्यात आणि अमरावतीत एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कोरोना व्हायरसचा वाजागाजा सरकार करत असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आज अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये विनामास्क घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्यासह दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावती शहर, अचलपूर शहर, अंजनगाव सुर्जी शहर व अन्य नऊ गावात लॉकडाऊन सुद्धा लावण्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांची लूट होत असल्याचा आरोपही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी मी कोरोना वार्डात जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रकाश पोहरे म्हणाले.