Exam Fever 2022: अमरावती -संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर ( Sant Gadge Baba University Amravati ) आज विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी या मागणीसाठी तीव्र आंदोलन ( student agitation in amravati university ) केले. या आंदोलनानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाईन द्यायचा की ऑफलाईन घ्यायचा हा निर्णय आता शासनाला घ्यावा लागणार आहे. दोन दिवसानंतर याबाबत शासन निर्णय घेणार असल्यामुळे भर उन्हात सुरू असलेले विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरचे विद्यार्थी आंदोलन स्थगित करण्यात आले.
अमरावती विभागातील विद्यार्थी धडकले होते विद्यापीठात -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर प्रमाणेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या ऑनलाईन व्हाव्यात या मागणीसाठी आज (सोमवार) महा विकास आघाडीतील काँग्रेसप्रणित एन एस यु आय, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना युवासेना आणि प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात समोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थी शेकडोंच्या संख्येत विद्यापीठासमोर धडकले होते.
कुलगुरूंना सादर केले निवेदन - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात समोर धडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाला भेटण्यासाठी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आले या वेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला परीक्षा ऑनलाइन असावी अशी मागणी करीत कुलगुरूंना निवेदन सादर केले. यानंतर कुलगुरूंनी आपला निर्णय लेखी स्वरूपात कळविण्यात येईल असे सांगितल्यावर कुलगुरूंचे लेखी पत्र येईपर्यंत विद्यार्थ्यांनी भर उन्हात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला.