अमरावती- मेळघाटात कोलकास येथील हत्ती सफारी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. हलत-डुलत चालणाऱ्या हत्तीवर बसून जवळपास पाऊण तास जंगलाच्या सफारी करण्याचा अनुभव पर्यटकांना मिळत आहे. मेळघाट वन्यजीव विभाग अंतर्गत सेमाडोह वन परिक्षेत्र कोलकास येथे २२ फेब्रुवारी २०१९ पासून पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्यात आली आहे.
व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक रेड्डी यांनी मेळघाटात वन्यजीव विभागाकडे असणाऱ्या ४ हत्तींना मेळघाटातील खोल दरीमध्ये वसलेल्या कोलकास येथे एकत्र आणून येथे पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सिपना नदीच्या काठावरून जंगल सफारीचा अविस्मरनिय असा अनुभव पर्यटकांना मिळतो. चारही हत्ती पर्यटकांच्या सेवेसाठी असून पाऊण तासाच्या सफरीसाठी वन्यजीव विभाग एकूण ८०० रुपये शुल्क आकारत आहे. हत्तीवर ४ पर्यटक बसून जंगल सफारी करू शकतात.