अमरावती - महाराष्ट्र्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने मंगळवारी विद्युत भवनासमोर द्वारसभा आयोजित केली होती. वीज कंपनीसंदर्भात शासनाने घेतलेल्या अनेक निर्णयांचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. खासगीकरण व फ्रेंचाइझीकरणाच्या माध्यमातून मागासवर्गीयांचा अनुशेष नष्ट करण्याचे धोरण बंद करण्यासह तीनही वीज कंपन्यांमधील धोरणात्मक प्रश्न सुटावेत, अशी मागणी द्वारसभेच्या माध्यमातून करण्यात आली.
'हा आत्मघातकी निर्णय'
महावितरण कंपनीच्या फ्रेंचाइझीकरणाचे धोरण विफल ठरले असताना ठाणे शहर परिमंडळातील मुंब्रा, कळवा आणि शीळ उपविभाग, नाशिक परिमंडळातील मालेगाव शहर याठिकाणी चांगला महसूल मिळत असताना हे क्षेत्र खासगी भांडवलदारांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय हा आत्मघातकी असल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केला आहे.