अमरावती -आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेचे विनयभंग करण्याच्या प्रकरणात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल असणाऱ्या मूर्तिजापूर येथील श्री. गाडगे महाराज महाविद्यालयचे प्राचार्य आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभाचे सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या प्राचार्य पदाच्या मुदतवाढीसाठी चक्क बनावट प्रस्ताव सादर करण्याच्या प्रकरणावरून आज विद्यापीठाच्या अधिसभेत गदारोळ झाला. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अधीसभेच्या सदस्यांच्यावतीने करण्यात आली.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -धक्कादायक..! अमरावतीत कार्यालयातच तलाठ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे, ग्रामस्थांनी दिला चोप
असे आहे प्रकरण
मूर्तिजापूर येथील श्री. गाडगेबाबा विद्यालय मंडळ संचालित श्री. गाडगेबाबा महाविद्यालयात डॉ. संतोष ठाकरे हे 22 जून 2016 रोजी प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. दरम्यान प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याची तक्रार नोव्हेंबर 2020 मध्ये मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. माझ्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केल्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू करणार नाही, असा दबाव प्राचार्य आपल्यावर टाकत असल्याचे प्राध्यापिकेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि आता डॉ. संतोष ठाकरे यांच्या प्राचार्य पदाची पाच वर्षे पूर्ण झाली असताना श्री. गाडगेबाबा विद्यालय मंडळाच्यावतीने प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या मुदतवाढीसाठी विद्यापीठाकडे मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात विद्यापीठाच्यावतीने दोन प्राचार्यांची समिती नेमून तसा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. मात्र, विद्यापीठाने संबंधित प्राचार्याविरोधात गुन्हे दाखल असल्यामुळे असा प्रस्ताव सादर करण्यास नकार दिला होता.
प्राचार्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव बनावट असल्याचा आरोप
मूर्तिजापूर येथील श्री. गाडगेबाबा विद्यालय मंडळाच्यावतीने श्री. गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांच्या प्राचार्य पदाचा कार्यकाळ 2021 मध्ये संपत असल्यामुळे त्यांना आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, विद्यापीठाच्या चौकशी समितीने महाविद्यालयातील प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले असल्यामुळे प्राचार्यांना मुदतवाढ मिळण्यासंदर्भात कुठलीही समिती देण्यास नकार दिला होता. यामुळे श्री. गाडगे महाराज विद्यालय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची आणि श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. भिसे यांची स्वाक्षरी घेऊन विद्यापीठाकडे प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांना दिलेली मुदतवाढ मंजूर करावी, असा प्रस्ताव सादर केला. या प्रकारामुळे विद्यापीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण समोर येताच दोन प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कुठलीही शहानिशा न करता निवड प्रक्रियेमध्ये बेकायदेशीर सहभाग घेऊन प्रस्तावावर सह्या केल्याने विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली.
अधिसभेत कारवाईची मागणी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेत गुरुवारी या विषयावरून चांगलाच गदारोळ झाला. प्राचार्य डॉ. मिनल ठाकरे, डॉ. स्मिता देशमुख, रवींद्र मुंदे, डॉ. प्रफुल गवई यांनी या प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. विद्यापीठाकडे बनावट प्रस्ताव सादर करणाऱ्या मूर्तिजापूर येथील श्री. गाडगेबाबा महाविद्यालय मंडळ या संस्थेवर कारवाई करावी तसेच, श्री गाडगेबाबा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान सभागृहाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ.एफ.सी. रघुवंशी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे का, हे आधी तपासले जाईल. प्रकरण न्यायप्रविष्ट नसेल तर, या प्रकरणात समिती गठित करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
हेही वाचा -मेळघाटातील लांडग्यांना रेबिजची लागण; वाघांवर ओढावले संकट