अमरावती -कोरोनामुळे पालक गमावलेल्या इनायतपूर येथील बालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची विचारपूस केली. अनाथ बालकांसाठी संगोपन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकही अनाथ बालक वंचित राहू नये यासाठी सर्वदूर शोधमोहिम, मदत मिळवून देणे, संस्थेत दाखल करणे आदी प्रक्रिया सातत्याने राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी शासनाकडून योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर बाजार तालुक्यातील इनायतपूर येथे भेट दिली. तहसीलदार धीरज स्थूल, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बालकांशी साधला संवाद
इनायतपूर येथील सुशांत राजेश धोंडे या 11 वर्षीय व जागृती राजेश धोंडे या 13 वर्षीय बालिकेच्या घरी भेट देऊन जिल्हाधिका-यांनी त्यांची विचारपूस केली. या बालकांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे आईचा आधार होता. मात्र, अलीकडेच कोरोनामुळे आईचेही निधन झाले. त्यामुळे या बालकांच्या योग्य संगोपनाच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिले.
तहसील कार्यालय आपल्या दारी -
चांदूर बाजार तालुका प्रशासनातर्फे ‘तहसील कार्यालय आपल्या दारी’ या उपक्रमात नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. जिल्हाधिकाऱयांनी त्याला भेट देऊन असा उपक्रम नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.
बांबूबनाचीही केली पाहणी -
पालकमंत्री पांदण रस्ता अभियानांतर्गत कोतगावंडी येथील रस्त्याची पाहणीही जिल्हाधिकाऱयांनी केली. पांदणरस्त्यांचे अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. चांदूर बाजार तालुक्यातील शहापूरला ई-क्लास जमिनीवर 2100 रोपांचे बांबूबन तयार झाले आहे. त्याचीही पाहणी जिल्हाधिकाऱयांनी केली.