महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 23, 2021, 4:38 PM IST

Updated : May 23, 2021, 4:47 PM IST

ETV Bharat / city

'ते' दिसले की उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलतो आनंद

साहस जनहितकारी सध्या गरजू लोकांसाठी मोठा आधार ठरतेय. जे लोक निराधार, मनोरूग्ण आहे, त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी चांदूर रेल्वे शहरात साहस जनहितकारी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले व इतर सदस्य त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत दोन्ही वेळचे जेवन व पाणी पोहचवित आहेत.

Distribution of food to the hungry
Distribution of food to the hungry

अमरावती - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुसऱ्या लाटेत राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या संकटात अनेकांना जीव गमवावा लागलाय तर अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. हाताला काम नसल्याने अनेकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता लागून राहिलीय. तसेच रस्त्यावर फिरणे व कुठेही झोपून रात्र काढणारे बेघर, मनोरुग्णांची अवस्था फार बिकट झाली आहे. सर्व काही बंद असल्यामुळे त्यांची भटकंती होत आहे. अशा कठीण प्रसंगात जातीय मतभेद विसरून एकत्र येऊन मदतीचा हात देणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. असाच एक प्रत्यय चांदूर रेल्वे परिसरात आला. शहरात कार्यरत असलेली साहस जनहितकारी सध्या गरजू लोकांसाठी मोठा आधार ठरतेय.

साहस जनहितकारी बहुउद्देशिय संस्थेकडून अन्नाचे वाटप
कोरोनाशी दोन हात करुन त्याला पिटाळून लावण्यासाठी अमरावती जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहे. मात्र जे लोक निराधार, मनोरूग्ण आहे, त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी चांदूर रेल्वे शहरात साहस जनहितकारी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले व इतर सदस्य त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत दोन्ही वेळचे जेवन व पाणी पोहचवित आहेत. जीवाची पर्वा न करता भुकेल्यांसाठी ते शहरात फिरताहेत. ते दिसले की निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. शहरात मेडीकल, दवाखाने वगळता काही एक सुरु नाही. अशा परिस्थितीत साहस जनहितकारी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले, सदस्य संजय शिंदे, अमित बागमार, लोकेश धामणकर, गजानन ठाकरे, नारीशक्ति फाऊंडेशनचे रेखा औंधकर, प्रवीण श्रीखंडे, रवि बजाज, महेश राउत हे शहरात फिरून बेघर, मनोरूग्ण व अपंग व्यक्ती जे बाहेरच कुठेही झोपतात अशा व्यक्तींना अन्नाचे वाटप करीत आहेत.

संपूर्ण शहरात फिरून त्यांचा शोध घेतला जातो व त्यानंतर त्यांना जेवण व पाणी दिले जाते. पूर्ण पोटभर जेवण होईपर्यंत हे सदस्य तेथेच थांबतात व त्यांना वाढून सुध्दा देतात. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार सगळे लाेक घरात बसलेले असताना ही मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भुकेल्यांना अन्न वाटप करीत फिरत आहेत. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतूक होत आहे. अशातच कोणालाही चांदूर रेल्वे शहरात किंवा आसपास असे भुकेने व्याकुळ असलेले व्यक्ती दिसल्यास त्यांनी साहस परिवाराच्या सदस्याला किंवा ९५०३१८९५५८ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांच्यावतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी सुध्दा साहस संस्थेने असाच कौतुकास्पद उपक्रम राबविला होता.

Last Updated : May 23, 2021, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details