अमरावती -पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ( Disaster Management ) मनुष्यहानी होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत विशेष पथक सज्ज होत आहे. पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी या पथकाचे प्रशिक्षण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होत असून यावर्षी पावसाळ्यात कमीत कमी हानी व्हावी, हेच लक्ष्य या पथकाचे आहे.
जिल्ह्यात आठ ठिकाणी झाले प्रशिक्षण -मान्सून पूर्व तयारी ज्या अनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवण गावातील युवक पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. अमरावती शहरातील वडाळी तलाव येथे 24 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आले यानंतर दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, मोर्शी, धारणी, चांदुर रेल्वे येथील मालखेड तलाव आणि चिखलदरा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणा अंतर्गत गावात पूर आला तर, नेमकी कशी खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
20 जणांचे पथक सज्ज -जिल्ह्यात कुठल्याही स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 12 महिने 24 तासांसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज आहे. या पथकात राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा ग्रामीण पोलीस यांचे सर्व मिळून दहा कर्मचारी नेहमीच सज्ज असतात. पावसाळ्यात मात्र नैसर्गिक संकटाची भीती अधिक असल्यामुळे या पथकामध्ये अमरावती महापालिकेतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह जिल्हा स्तरावरील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश केला जातो. सुमारे 20 ते 25 जणांचे पथक पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. या पथकाकडे विशेष अशी रबर बोट असून नदीच्या पुरात सापडलेल्या एकूण 10 व्यक्तींना एका बोट द्वारे वाचविता येऊ शकते. या पथकाकडे अशा एकूण चार बोटी आहेत.