अमरावती -दिवाळीच्या पर्वावर भाविकांना चक्क पैशांच्या स्वरूपात प्रसाद वितरीत करण्याची प्रथा अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमी लगत असणाऱ्या कालीमाता मंदिरात गत 36 वर्षांपासून जोपासली जात आहे. मंदिरातील हा प्रसाद प्राप्त करण्यासाठी हजारो भाविक दिवाळीच्या रात्री मंदिरात काली मातेच्या दर्शनासाठी येतात दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मंदिरातून पैशांचा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळते.
बरकत नावाने ओळखली जाते ही प्रथा -
दिवाळीच्या पर्वावर कालीमाता मंदिरातून पाच किंवा दहा रुपये याप्रमाणे मिळणाऱ्या पैशांचा प्रसाद हा भक्तांच्या आयुष्यात समृद्धी आणतो, असा विश्वास अनेकांना असून पैशांच्या प्रसादाची ही प्रथा बरकत नावाने ओळखली जाते. अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश इथूनही भाविक दिवाळीच्या रात्री बरकत मिळविण्यासाठी या मंदिरात येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त पप्पू महाराज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
यावर्षी मोजक्याच भाविकांना मिळाला प्रसाद -
कोरोनामुळे गत वर्षी मंदिर बंद असल्यामुळे दिवाळीच्या रात्री बरकतचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यावर्षी शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी दिली असली तरी पोलिसांनी दिवाळीच्या रात्री बरकत मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्यामुळे हा कार्यक्रम यावर्षीही आयोजित करण्यात येऊ नये, असे मंदिर प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार मंदिर प्रशासनाच्यावतीने यावर्षीही बरकतचा कार्यक्रम रद्द केला. दरवर्षी रात्री नऊ वाजता मंदिरात आरती होते आणि त्यानंतर बरकत अर्थात पैशांचा प्रसाद भाविकांना वितरित केला जातो. रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात असते पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे यावर्षी मंदिराच्या विश्वस्तांनी सायंकाळी साडेपाच वाजता मंदिरात आरती केल्यावर त्यानंतर मंदिरात येणाऱ्या मोजक्याच भाविकांना बरकत अर्थात पैशांचा प्रसाद वितरीत केला.
रात्री एक वाजेपर्यंत होती भाविकांची गर्दी -
दिवाळीच्या बरकत अर्थात पैशांचा प्रसाद मिळवण्यासाठी अमरावती शहरातील विविध भागातील भाविक रात्री दहानंतर मंदिर परिसरात येत होते. पोलिसांनी मंदिरापासून काही अंतरावर बॅरिकेट्स लाऊन यावर्षी बरकतचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती भाविकांना दिली. असे असले तरी मंदिरापर्यंत येणाऱ्या भाविकांनी कालीमातेचे दर्शन घेतले. सलग 36 वर्षांपासून मंदिरात येणाऱ्या काही भाविकांना मात्र मंदिराच्यावतीने पैशांचा प्रसाद वितरीत करण्यात आला. रात्री एक वाजता ही मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती.
हेही वाचा -गृहोद्योगाच्या माध्यमातून दिवाळी फराळाची विक्री.. त्याच पैशातून होते दिवाळी साजरी