अमरावती - सरकारी शाळेच्या नावाने नाक मुरडणाऱ्या पालकांनी आता महानगर पालिकेच्या शाळेची वाट धरली आहे. दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षण देण्यासाठी अमरावती महानगर पालिकेने कंबर कसली आहे. यंदापासून महानगपालिकेच्या शाळेमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण ( municipal school English Amravati ) देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच वर्षी थोडे थाडके नव्हे, तर १४०० विद्यार्थ्यांनी विविध इयत्तेत प्रवेश घेतला आहे. अमरावती महानगरपालिका ( Amravati Municipal Corporation ) अंतर्गत एकूण ६३ शाळा आहेत. त्यापैकी १३ शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजीक यांनी दिली आहे.
खासगी शाळांच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके, गणवेश, टाय, बेल्ट तसेच इतरही साहित्य मोफत देण्यात येते. पहिल्याच वर्षी महानगपालिकेच्या १३ शाळांमधून ४०३ विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे. लाख रुपये फी भरून खासगी शाळेत प्रवेश घेण्यापेक्षा महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याला नागरिक प्राधान्य देत आहे.