मुंबई- राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने पुन्हा वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. या आठवड्यात राज्यात आता दररोज ३ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये विदर्भातील अमरावती, अकोला यवतमाळ, वर्धा या ठिकाणची संख्या लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या कोरोना महामारीचा कहर अद्यापही आटोक्यात आलेला नाही. राज्यात जानेवारीपर्यंत आटोक्यात आलेला कोरोना विषाणू पुन्हा वेगाने पसरू लागला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही सुरू आहे. मात्र, त्या तुलनेत कोरोना बाधितांचे प्रमाणदेखील वाढू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. शनिवारी राज्यात 6281 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यात अमरावती, वर्धा आणि अकोलामध्ये रुग्णसंख्येचा आकडा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अमरावतीत सोमवारपर्यंत संचारबंदी-
जिल्ह्यातील कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शनिवारी सायंकाळपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंतच्या कडक संचारबंदीची लागू करण्यात आली. याकरिता शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लॉकडाऊन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी रस्त्यांवर पाहणी केली. दरम्यान आज अमरावती जिल्ह्यात वर्षभरातील सर्वाधिक तबल 727 नवे रुग्ण आढल्याने व 7 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
वर्धा जिल्ह्यात ३६ तासांची संचारबंदी
वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या संकटातून सावरत असताना पुन्हा रुग्ण संख्या वाढ होत असल्याने कोरोना रुग्णसंख्या नियंत्रीत करण्यासाठी प्रशासनाने इतर उपाययोजनांसोबतच जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागात ३६ तासांची संचारबंदीची घोषणा केली आहे. प्रशासनाने यापूर्वीच हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, लग्न सभारंभ यावर नियमावाली जाहीर केली होती. तसेच महाविद्यालय बंदचे आदेशही जाहीर केले होते.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लक्षणे असलेल्या व्यक्तींचे विलगीकरण तसेच चाचणीला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालवधीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाईचा सूचना दिल्या आहेत.
अकोल्यात दर रविवारी आणि रोज रात्री संचारबंदी लागू-
अकोला - जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दररोज दीडशेच्यावर रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या नियमांमध्ये सूट दिल्याने रुग्ण वाढत असल्याची चर्चा आहे. रुग्ण वाढण्याचे नेमके कारण अद्याप कोणीही स्पष्ट करून सांगत नाही आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने दर रविवारी आणि दररोज रात्री कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच परत संचारबंदी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यातही संचारबंदी लागू-
वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात बुधवारी १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी राहील. पुढील आदेशपर्यंत मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
बुलडाण्यातही संचारबंदीचे आदेश जारी-
बुलडाणा - जिल्ह्यात सर्वाधिक 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) 17 फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ही परिस्थिती पाहता आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
पंढरपुरात उद्यापासून संचारबंदी-
सोलापूर(पंढरपूर) - माघी एकादशी निमित्त 23 फेब्रुवारीला पंढरपूरमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहर व आसपासच्या 10 गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माघी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. मात्र, यादरम्यान एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा माघी एकादशी सोहळा 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर येथे पार पडणार आहे. या दिवशी पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहरासह शेगाव दुमाळे, लक्ष्मी टाकळी, वाखरी, गोपाळपूर, गादेगाव, कोर्टी, शिरढोण, कौठाळी, चिंचोली भोसे या गावांमध्ये संचारबंदी असणार आहे.