अमरावती - कोरोनाच्या संकट काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोरोना चाचणी केंद्राने 10 जून रोजी तीन लाख चाचण्यांचा टप्पा गाठला आहे. या केंद्रात सद्या रोज 2 हजार 400 चाचण्या केल्या जात आहेत.
24 सॅम्पल पासून झाली होती सुरुवात
कोरोना नेमका काय आहे, याची कुणालाही माहिती नव्हती, नेमके काय करायचे याचेही ज्ञान नसताना कोरोना चाचणी हेच सर्वात आधी महत्वाचा उपाय म्हणून समोर आले तेव्हा अमरावतीच्या रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल नागपूर आणि अकोला येथून येत होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे डॉ. प्रशांत ठाकरे आणि त्यांच्या सहकारी प्रा.डॉ. नीरज धनवटे यांनी कोरोना चाचणी करणे आपल्याला शक्य आहे, असे स्पष्ट करताच माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नाने एम्सच्या तज्ज्ञांनी 18 मार्च 2020 ला विद्यापीठाच्या चाचणी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमार) कडून त्यास मान्यता मिळाली.
हेही वाचा -अमरावतीत दुचाकी आणि गाडीची झाली धडक; दोन ठार तर एक जखमी
डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. नीरज धनवटे यांना 2 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्यावर आयसीएमारने सुरुवातीला काही सॅम्पल चाचणीसाठी दिले. विद्यापीठाच्या या केंद्राने अचूक चाचण्या केल्यावर 4 मे 2020 ला या केंद्राला 24 स्वॅबचे नमुने देण्यात आले. ही अधिकृत चाचणी होती. त्यादिवसापासून या केंद्रात सुरू असणाऱ्या कोरोना चचणीचा आकडा आता तीन लाखांच्यावर गेला आहे.
..असा गाठला 3 लांखांचा टप्पा
विदर्भात अमरावतीपूर्वी नागपूर आणि अकोल्याला कोरोना चाचणी सुरू झाली. असे असले तरी आज नागपूरने साडे तीन लाख आणि अकोल्याने तीन लाख कोरोना चाचण्या नुकत्याच केल्या असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रानेही बऱ्याच उशिराने सुरुवात करून तीन लाख चाचण्या पूर्ण केल्या आहेत. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 1 लाख चाचण्या पूर्ण केल्या होत्या, तर मार्च महिन्यात 2 लाख सॅम्पल तपासण्यात आले. अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी केंद्रात एकूण 45 जण काम करत आहेत. यामध्ये 13 लॅब टेक्निशियन, दोन वैज्ञानिक, पुणे येथे मायक्रोबॉयोलॉजी शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी लॉकडाऊनमुळे या केंद्रात स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत. तसेच, डेटा एन्ट्री ऑपरेटर, असे सर्वांच्या टीम वर्कने आज 3 लाख चाचण्या पूर्ण झाल्या आल्याचे डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. नीरज धनवटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले