मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे, तसेच शिवसेनेसोबत सुमारे दहा वर्षांपासून आपला संघर्ष असल्याचे राणा यांचे म्हणणे आहे. जात प्रमाणपत्राचा मुद्दा नवीन असला तरी याशिवायही राणा माध्यमांत कायम चर्चेत असतात. संसदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी काही वेळेस केंद्र सरकारवर तर काही वेळेस राज्य सरकारवरही टीका केली आहे.
संसदेत अरविंद सावंतांनी धमकाविल्याचा आरोप
मार्च महिन्यात पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान राणांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही त्यांचा शिवसेनेसोबतचा वाद ठळकपणे समोर आला होता. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांचा मुद्दा संसदेत उपस्थित करताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप राणांनी केला होता. याविषयी एक पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं. अरविंद सावंतांनी मात्र हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. राणा यांचा शिवसेनेवर राग आहे म्हणून त्या असा आरोप करत आहेत असे सावंत त्यावेळी म्हणाले होते.
बाळासाहेब गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला
यानंतरही संसदेत राणांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत होते. परंतु बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला, अशी टीका राणा यांनी या घटनेनंतर लोकसभेत बोलताना केली होती.
जात प्रमाणपत्राचा वाद
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत 2014 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत राणांचा पराभव झाला होता. मात्र जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी निवडणूक लढविली आणि त्या विजयीही झाल्या. मात्र आता उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले आहे.