अमरावती - मागील काही दिवसांपासून पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत असून अमरावती तर पेट्रोल आज 95 रुपयांच्या घरात येऊन पोहोचले आहे. आज अमरावतीत पेट्रोलचा प्रती लिटरचा दर हा 94.27 रुपये तर डिझेलचा दर हा 84.76पर्यंत येऊन पोहोचल्याने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने नागरिक हैराण झाले आहेत.
नोकरदार वर्ग चिंतेत
मागील काही महिन्यापूर्वी 85 रुपये लिटरपर्यंत असलेले पेट्रोल हे आता शंभरी गाढणार की काय, अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांना फटका बसला त्यात ग्रामीण भागातील शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी व सामान्य नागरिक नोकरदार वर्ग चिंतेत असताना आता अमरावती जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांपर्यंत येऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
बजेट कोलमडले
वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमूद केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.